जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 7 January 2020

आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय कामकाज होणार सुलभ - जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे


आय-पास संगणक प्रणालीवर कार्यशाळा
      जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज ‘पेपरलेस’ होण्याच्या दृष्टीने ‘आय-पास’ ही वेब बेस्ड संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात ही प्रणाली राबविण्याकरीता मान्यता देण्यात आली असून या आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय कामकाज करणे सुलभ होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.
        7 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आय-पास या संगणकीय प्रणालीवर कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी डॉ.बलकवडे बोलत होत्या. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी़ एस.ई.ए.हाश्मी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती बुलकुंडे, ईएसडीस कंपनीचे किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
        डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, आपणास आय-पास प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही प्रणाली येत्या 1 एप्रिल 2020 पासून सुरु करण्यात येत असल्यामुळे सर्वांनी या आय-पास प्रणालीमध्ये लक्ष देवून कामे करावीत. कोणाला काही शंका असल्यास संबंधितांकडून त्याचे निरसन करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले.
        डॉ.दयानिधी म्हणाले, आय-पास प्रणालीद्वारे संगणकीय काम करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
        श्री.सुटे म्हणाले, आय-पास प्रणाली योग्यप्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. या प्रणालीमुळे पारदर्शक प्रशासन, गतिमान प्रशासन, परिणामकारक सनियंत्रण, लोकाभिमुख प्रशासन व पेपरलेस कामकाज होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
        श्री.पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना, खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, पर्यटन विकास कार्यक्रम, अल्पसंख्याक विकास कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम इत्यादी योजनांना प्रशासकीय मंजूरी, निधी वितरण व युटीलायझेशन सर्टिफिकेट याबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली.
        प्रास्ताविक व संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदिप भिमटे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले यांनी मानले. कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment