जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 4 August 2017

बिरसी विमानतळावर विमान अपहरण घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची प्रात्यक्षिके




काही वर्षापूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व देशातील एखादया विमानतळावरुन विमानाचे अपहरण झाले तर कोणत्या प्रकारच्या उपययोजना केल्या पाहिजे याचे प्रात्यक्षिक 4 ऑगस्ट रोजी बिरसी येथील भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या विमानतळावर करण्यात आली.
      उपाययोजनांची रंगीत तालीम घेवून यावेळी बिरसी विमानतळ समितीची सभा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विमान कशाप्रकारे संपर्कात येवू शकते. अचानक त्या विमानाचे अपहरण कशाप्रकारे होते व अपहरणाचे कोडवर्ड याबाबतची माहिती या प्रात्यक्षिकातून देण्यात आली.
       प्रात्यक्षिकाच्यावेळी धावपट्टीवर 3 ॲम्बुलंस, 1 अग्नीशमन वाहन, श्वानपथक, पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कंट्रोलरुम येथून पोलीस अधीक्षक यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश बिनतारी संदेशातून प्रात्यक्षिक करणाऱ्यांना दिले. यावेळी कंट्रोल रुममधून प्रात्यक्षिकाची पाहणी उपस्थितांनी केली.
      यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी बिरसी विमानतळ समितीची सभा घेतली. सभेला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, बिरसी विमानतळचे संचालक सचिन खंगार, प्रविण गडपाल, अजय वर्मा, विनयकुमार ताम्रकार, संदिप पिंपळापुरे, देवेंद्र गौर, के.एस.राव, श्री.सोनवणे, ओ.एस.पशीने, श्रीमती रिंचेन डोलमा, विजय अहिरे यांची उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, बिरसी विमानतळ येथे सुध्दा 24 तास कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे. विमान अपहरणासारखी घटना या विमानतळावर होणार नाही यादृष्टीने दक्ष असले पाहिजे. विविध भाषा जाणणारे व्यक्ती या समितीमध्ये असावे. विमानतळ प्राधिकरणाचा स्वतंत्र प्रसारमाध्यम अधिकारी नेमण्यात यावा अशी उपयुक्त सूचनाही त्यांनी यावेळी केली.

      डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे पोलीस विभागाचे बंदोबस्त नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात असतो. पुरेसे पोलीस बळ सुध्दा जिल्ह्यात नाही. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षीत पोलीस दल नसल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने अर्धसैनिक दलाच्या तुकड्यामार्फत सुरक्षेची जबाबदारी दिल्यास उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.खंगार यांनी विमानतळ सुरक्षेबाबतची व मागच्या सभेची माहिती यावेळी दिली.

No comments:

Post a Comment