जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 12 July 2016

सालेकसा पुरातन व पर्यटन


   
      गोंदिया जिल्हयातील सालेकसा तालुक्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. या तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटनस्थळी झालेल्या विकासामुळे परिसरातील गावकऱ्यांना बऱ्यापैकी रोजगाराच्या संधी प्राप्‍त झाल्या आहेत.
          सालेकसा तालुक्यात पुरातान्विकदृष्टया काही अवशेष मिळाल्यामुळे या तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कचारगडची गुंफा पुरातात्विकदृष्टया महत्वाची आहे. या गुफेची उत्तर-दक्षिण लांबी 58 मीटर असून उंची 57 मीटर आहे. एकाच दगडातून या गुफेची निर्मिती झाली आहे हि वैशिष्टयपूर्ण बाब आहे. एकाच वेळी 200 लोक या गुफेमध्ये बसू शकतात एवढी ही गुफा प्रशस्त आहे. आदिवासी समाजाचे उगमस्थान व पवित्र धार्मिक स्थळ म्हणून कचारगडची गुफा प्रसिध्द आहे. एका गोंडी गितानुसार महादेवाने गोंड लोकांना लोखंडी गुफेत बंदिस्त करुन दरवाज्यावर एक मोठा दगड ठेवला. आदिवासींचा नेता लिंगो यांने दगड हटवून सर्व लोकांना मुक्त केले. हेच आदिवासीचे पूर्वज होते. असे सांगण्यात येते.
          कचारगड येथील उत्खननात कु-हाड, छिन्नी, उखळ ही पाषाणशस्त्रे सापडलेली आहेत. त्याचप्रमाणे मातीची भांडी देखील मिळालेली आहेत.
          कचारगड येथे दरवर्षी पाच दिवसांची यात्रा भरते. पर्यटक व जवळपास 9 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होतात. हाजराफॉल सालेकसाच्या पूर्वेला असून पर्यटकांना आकर्षित करणारे निसर्गरम्य स्थळ आहे. पाण्याचा प्रचंड प्रवाहाला हाजराफॉल म्हणत असून हाजराफॉल बघताच शुभ्र, फेसाळ, दुधाच्या धारा वाहत असल्याचा भास होतो. दरवर्षी पावसाळयादरम्यान हाजराफॉल प्रचंड वाढलेला प्रवाह बघण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.
          सालेकसातील जागृत देवस्थान म्हणून गडमाता मंदिर मान्यता पावले आहे. राज्यसरकारच्या वतीने कचारगड व हाजराफॉल प्रमाणेच गडमाता मंदिरलाही पर्यटनाचा क श्रेणीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्रीत येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. गडमाता मंदिराच्या गडाच्या उंचीपर्यंत गेल्यावर  सालेकसा तालुक्याचे विहंगम नयनरम्य दृश्य व निसर्ग दृष्टीस पडतो.
          सालेकसातील पर्यटन स्थळांमध्ये हलबीटोला येथील त्रिलोकेश्वरधाम येथील सर्वत्र वनराई बघता येते. 51 फुटाचे त्रिशूल व भगवान शंकराची प्रचंड मुर्ती येथील खास आकर्षण होय.

No comments:

Post a Comment