जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 30 July 2016

लाभार्थ्यांच्या प्रतिसादामुळे समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप - पालकमंत्री बडोले




• ग्राम समाधान पंधरवाडा साजरा करणार
                           • 21 हजार लाभार्थ्यांची शिबीराला भेट
                 • 40 स्टॉल्समधून विविध योजनांची माहिती व अर्ज वितरण
            महाराजस्व अभियानाअंतर्गत 40 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा संकल्प आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असून विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गावोगावी शिबिराची माहिती देवून लाभार्थ्याना विविध योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे समाधान शिबिराला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            आज 30 जुलै रोजी गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पूर्व तयारी समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, माजी आमदार हेमंत पटले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, पं.स.सभापती दिलीप चौधारी, उपसभापती बबलू बिसेन, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, पं.स.सदस्य श्री.जनबंधू, डॉ.लक्ष्मण भगत, रेखलाल टेंभरे, रविकांत बोपचे यांचेसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, गोरेगाव तालुक्यातील 31 हजार लाभार्थ्यांनी या शिबिरातील विविध स्टॉलला भेट देवून योजनांची माहिती जाणून घेतली आहे. योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचविण्यासाठी या शिबिराचा उपयोग झाला आहे. यंत्रणा व लाभार्थ्यांमधील दरी कमी होण्यास या शिबिराची मदत झाली आहे. लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करुन त्यांना योजनांचा लाभ देण्यात येईल. अधिकारी व पदाधिकारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी केलेले काम कौतुकास्पद आहे.
             1 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा पंधरवाडा साजरा करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, गावातील प्रत्येक कुटुंबाला महासमाधान शिबिराच्या माध्यमातून एकातरी योजनेचा लाभ मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी विविध योजनांचे घेतलेले अर्ज परिपूर्ण भरुन येत्या पंधरवाड्यात योजनांचा लाभ मिळण्यासाठी तयार केले जातील. ज्या लाभार्थ्यांनी योजनांचे अर्ज घेतले नसतील अशा लाभार्थ्यांपर्यंत हे अर्ज पोहोचविण्यात येतील. 10 ऑगस्ट पर्यंत योजनांचा लाभ मिळण्याबाबतची सर्व प्रकरणे समाधान कक्षात पोहोचली पाहिजे. गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व विविध यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ मिळेल असे नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            डॉ.सूर्यवंशी म्हणाले, समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना योग्यप्रकारे व व्यवस्थीतपणे देण्याचा प्रयत्न आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला आहे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य मानून यंत्रणांनी काम करावे. दिव्यांग बांधवांना सुध्दा स्वावलंबी करण्यासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियानातून मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी आहे. लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळण्याबाबत स्वत: अर्ज दयावा. हे महासमाधान शिबीर राज्यात एक आदर्श निर्माण करेल असा विश्वास डॉ.सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
            आ.रहांगडाले म्हणाले, समाधान शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे समाधान करण्यास मदत झाली आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. शासन व प्रशासन लाभार्थ्यांच्या जवळ येऊन योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            डॉ.भुजबळ म्हणाले, हे शिबीर महासमाधान शिबिराची पूर्व तयारी आहे. लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास शिबिराचा लाभ होत आहे. विविध यंत्रणांच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यास मदत होत आहे. पोलीस विभाग प्रतिसाद ॲपमुळे संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी काम करणार आहे. दारुबंदीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे यासाठी पोलीस प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतने येत्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घेवून अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यक्तीची, अवैध दारुविक्री होत असलेल्या दुकान, पानठेले याची माहिती पोलीस विभागाला देवून सहकार्य करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव व टोला दारुमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ.रामगावकर म्हणाले, समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांनी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. वन विभागाकडून वन्य प्राण्यांकडून शेतीच्या नुकसान भरपाईपोटी मदत करण्यात येत असल्याचे सांगून वन विभागामार्फत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगतच्या गावांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री.पटले म्हणाले, तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामुळे अनेकांना योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांनी जाणून घेवून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
            सभापती चौधरी म्हणाले, शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजना आहे. परंतू त्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नाही. या शिबिरामुळे लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास व त्या योजनांचा लाभ घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
            पंचायत समिती परिसरात समाधान शिबिराच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती देणारे 40 स्टॉल लावण्यात आले होते. दिव्यांग व्यक्तींची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या नेतृत्वात डॉ.सतीश जयस्वाल यांचेसह अन्य तज्ज्ञ डॉक्टर्सनी केली. तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थ्यांनी विविध स्टॉलला भेटी देवून आपल्याला ज्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनांची माहिती जाणून घेतली व संबंधित स्टॉलमधून योजनेचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज घेतले. तहसिल कार्यालय येथे महासमाधान शिबिराच्या निमित्ताने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबतचे परिपूर्ण अर्ज समाधान नियंत्रण कक्षात पुरक कागदपत्रासह 10 ऑगस्ट पर्यंत आणून दयावे.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे, नायब तहसिलदार सर्वश्री सोमनाथ माळी, श्री.वेदी, जी.आर.नागपुरे, एस.एम.नागपूरे, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती श्रीवास्तव, भूमिअभिलेखचे श्री.मेश्राम, महावितरणचे श्री.भांडारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.जाधव, पं.स.चे विस्तार अधिकारी श्री.सिंगनजुडे, श्री.गिरीपुंजे, श्री.साकुरे, समीर मिर्झा, सर्व तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच तालुका पातळीवरील विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी  आणि बार्टीच्या समतादूतांनी परिश्रम घेतले.
            कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, तसेच लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी केले. संचालन स्मीता आगासे यांनी तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे यांनी मानले

No comments:

Post a Comment