जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 23 January 2018

भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी - राजकुमार बडोले

      भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे हे प्रत्येक जागरुक नागरिकाला वाटते. जिथे भ्रष्टाचार, गैरव्यवहार होतात त्याबाबत लोक आवाज उठवून होणारा भ्रष्टाचार निदर्शनास आणत असतात. भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या येणाऱ्या तक्रारींची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
    23 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     श्री.बडोले म्हणाले, तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांच्या नियमीत बैठका झाल्या पाहिजे. तालुक्यात अनेक नागरिकांच्या विविध विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारी असतात. अनेक कामाची गुणवत्ता चांगली राहत नसल्यामुळे नागरिक याबाबत भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी करीत असतात. अशा तक्रारींची तालुका प्रशासनाने गंभीरतेने दखल घेवून तक्रारकर्त्या नागरिकांना दिलासा दयावा व त्या कामाची चौकशी करुन कामात पारदर्शकता राहील यादृष्टीने काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची नियमीत बैठक दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येईल. भ्रष्टाचाराबाबत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची वेळीच दखल घेवून त्यांचे समाधान करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       सभेला समितीचे सदस्य कविता रंगारी, उमाकांत ढेंगे, विश्वजीत डोंगरे, बसंतकुमार गणवीर, रतन वासनिक, विनोद किराड यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment