जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 28 January 2018

कचारगड यात्रेतील भाविकांची गैरसोय टाळा - पालकमंत्री बडोले


      देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला येत्या 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार असून देशातील विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होणार आहे. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण यात्रेदरम्यान येणार नाही यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांच्या व देवस्थान समितीच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 27 जानेवारी रोजी कचारगड येथे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या यात्रेच्या तयारीचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम, आ.संजय पुराम, आ.डॉ.अशोक उईके, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    श्री.बडोले म्हणाले, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ जल, स्वच्छ परिसर व स्वच्छ अन्न या प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या घोषवाक्यानुसार तिथे व्यवस्था असली पाहिजे. भाविक महिलांसाठी मोबाईल शौचालयाचा वापर करावा. भाविकांसाठी आंघोळीची व्यवस्था असावी. यात्रेदरम्यान बेवारटोला प्रकल्पातून पाणी नाल्यात सोडल्यास भाविकांना आंघोळीसाठी, शौचालयासाठी  तसेच पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता होईल. सर्व भाविकांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी यात्रेदरम्यान मिळावे यासाठी प्रशासन व देवस्थान समितीने लक्ष्य दयावे. यात्रेदरम्यान मंचावरुन कोणीही प्रक्षोभक भाषणे देणार नाही याची देवस्थान समितीने दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
     राजे अंब्रीशराव म्हणाले, यात्रा ही सर्वांसाठी आहे. यात्रेदरम्यान कोणीही भडकावू भाषण देणार नाही याची दक्षता घेवून अशांना पोलिसांनी ताब्यात घेवून कारवाई करावी. मागील 25 वर्षापासून कचारगड येथे यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र आपण भाविकांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देवू शकलो नाही ही खंत आहे. देवस्थान समितीने यात्रेदरम्यान जबाबदारीने काम करावे. अलीकडच्या तीन वर्षाच्या काळात बरीच विकासकामे कचारगड परिसरात झालेली आहे. यात्रेत भाविकांना समस्यांच्या सामना करावा लागू नये असे त्यांनी सांगितले.
       आमदार पुराम म्हणाले, यात्रेदरम्यान दिवसा पोलिसांचा बंदोबस्त असतो मात्र रात्रीला पोलीस कमी असतात. विशेषत: रात्रीला मोठ्या संख्येने विविध राज्यातून येणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी येत असल्यामुळे रात्रीला पोलीस बंदोबस्त असावा. कचारगड येथे विशाल सभागृह बांधण्यासाठी राज्य शासनाने 5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यात्रेदरम्यान सभागृह बांधकामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाने आदिवासी बांधवांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल यात्रेदरम्यान लावावे असे सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, यात्रा ही भव्य स्वरुपात होत असल्यामुळे आणि देशातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येत असल्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. विविध यंत्रणांवर जबाबदारी सोपविली आहे. बेवारटोला प्रकल्पातून 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान नाल्यात पाणी सोडण्यास आपली तत्वता मान्यता असल्याचे सांगितले. यात्रेसाठी जिल्हा निधीतून 3 लक्ष रुपये देणार असल्याचे ते म्हणाले.
     प्रभारी उपवनसंरक्षक शेंडे म्हणाले, यात्रेच्या काळात यात्रा परिसरातील जंगलात लोकांकडून आगी लागण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेता वन विभाग सतर्क असून तैनात वन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात येईल.
       यावेळी सालेकसा तहसिलदार सांगळे यांनी सांगितले की, यात्रेच्या तयारीच्या दृष्टीने तालुका प्रशासनाची 8 जानेवारीला सभा घेण्यात आली. तालुका पातळीवरील 12 विभागांचा सहभाग यात्रा यशस्वीतेसाठी राहणार आहे. योग्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. भाविकांसाठी मदत केंद्रही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       कचारगड यात्रेदरम्यान 20 अधिकारी व 120 कर्मचारी दोन पाळीमध्ये ड्युटीवर राहणार आहे. पार्कींगची जागा निश्चित असते तसेच सी.60 चे जवान तैनात असतील. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येतील असे सालेकसा पोलीस निरिक्षक श्री.खंदारे यांनी सांगितले.
       यात्रेदरम्यान धनेगाव येथे वैद्यकीय पथक व ॲम्बुलन्स तैनात करण्यात येणार आहे. रुग्ण तपासणी, पाणी तपासणी करण्यात येईल. यात्रेदरम्यान अन्न विषबाधा होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. स्टॉलधारकांना याबाबत कळविणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.येरणे यांनी सांगितले.     
       भाजपचे महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी यात्रेदरम्यान महिला भाविकांसाठी मोबाईल शौचालयाची व्यवस्था असावी तसेच यात्रेदरम्यान आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनांची प्रचार-प्रसिध्दी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
       देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.कोकाडे यांनीही येणाऱ्या अडचणी सांगितल्या. आढावा बैठकीला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजु नवले, देवरी तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी ए.एल.खाडे, आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी गिरीश पाहुणे, सालेकसाच्या महावितरणचे ए.पी.राठौर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता डी.यु.तुरकर, कनिष्ठ अभियंता ए.एम.अडमे, उपविभागीय अभियंता प्रकाश लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.सी.दमाहे, शाखा अभियंता एन.जी.खोंड, सहायक पोलीस निरिक्षक अविनाश मते, अंकुर कापसे, कोसमतर्राचे सरपंच वैभव बागडे, ग्रामसेवक पी.एम.चव्हाण, ए.एस.आवळे, मंडळ कृषि अधिकारी एस.व्ही.भोसले, एस.के.दोनोडे, ए.एच.टेंभूरकर, डी.एच.धापोड, व्ही.सी.लाडे, के.बी.शहारे, पी.व्ही.राऊत, गोपालसिंह उईक, संतोष पंधरे यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment