जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 13 January 2017

गोंदिया फेस्टीवलनिमित्त फोटोग्राफी वर्कशॉप

          

फोटोग्राफीसोबतच वन्यजीवांच्या संरक्षणाची चळवळ उभी व्हावी
                                                             - अभिमन्यूकाळे 
         देशात वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जाणीव उशिरा रुजली आहे. 1982 च्या वन कायदयामुळे जंगलाच्या संरक्षणाला सुरुवात झाली आहे. केवळ जंगलात वन्यजीवांचे फोटो काढण्यापूरतेच काम मर्यादित न ठेवता वन्यजीवांच्या संरक्षणाची चळवळ उभी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले
         गोंदिया फेस्टीवलनिमित्ताने आज हॉटेल गेटवे येथे  फोटोग्राफी वर्कशॉपचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी काळे बोलत होते. उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रसिध्द आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
           श्री काळे पुढे म्हणाले, जंगले ही आपल्याला आनंद देणाऱ्या वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने आहेत. जंगलातील पशूपक्षांचे संरक्षण आणि संवर्धन कशाप्रकारे करता येईल. यादृष्टीने काम झाले पाहिजे. मानव आणि निसर्ग यांचा एकत्रित अधिवास आता अत्याआवश्यक झाला आहे. बिबटसारखे प्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागली आहे. त्यांचा अधिवास देखील धोक्यात आल्याचे यावरुन दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून सारस संवर्धनासोबतच सेंद्रीय शेतीची चळवळ उभारावी लागणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, सेंद्रीय शेती आणि वन्यपशू पक्षी यांचा जवळचा संबंध आहे. शेतातील उत्पादनासाठी करण्यात येत असलेल्या रासायनिक खते आणि औषंधाचा वापर आज वन्यपशू पक्षांच्या जीवावर उठले आहे. या खतांच्या व औषधांच्या वापरामुळे पशुपक्षांचे खाद्य कमी होत आहे. त्यामुळे स्थलांतरीत पक्षी जिल्हयात तलावांवर हळूहळू कमी येतील. त्यामुळे त्यांचा अधिवास वाढविणे गरजेचे आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
              जिल्हयातील 12 ते 15 तलावाच्या परिसरात पक्ष्यांचा अधिवास वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल असे सांगून श्री काळे म्हणाले यासाठी तलावांच्या परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पक्षीनिरीक्षणासाठी या तलावाच्या परिसरात मनोरे उभारले जातील. होम स्टेच्या दृष्टीने ग्रामस्थांना या चळवळीत सहभागी करुन घेण्यात येईल. त्यामुळे त्यांनाही वाटेल की आपला गाव परिसरात बाहेरच्या लोकांना यायला आवडते. निसर्ग संवर्धनात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले जिल्हयातील गोंडी चित्रकलेचा प्रसार करणार असल्याचे सांगितले.  
                डॉ. रामगावकर म्हणाले, गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून एकप्रकारे पर्यटन महोत्सवालाचा सुरुवात झाली आहे. जिल्हयाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. छायाचित्रकार हा हौस म्हणून चित्र काढतो. वन्यजीवाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून फोटोग्राफी करतो. त्यांचे जीवनपट तो उघड करतो. या बाबी आपण बघत नाही. वन्यजीवांच्या संरंक्षणात छायाचित्रकारांची भूमिका महत्वाची असते. या भूमिकेतून वन्यजीव व वनाच्या संरक्षणात महत्वाचे योगदान मिळत असते. असे त्यांनी सांगितले.                                                                                  श्री खानोलकर म्हणाले, वन्यजीवांचे छायाचित्र काढणे ही एक प्रकारची नशाच आहे. फोटोग्राफीसाठी नियोजन आणि संशोधन आवश्यक आहे. पक्षांचे फोटो काढण्याचा आनंद घेण्यासोबतच त्यांची वागणूक टिपणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. मात्र वेळेचे भान ठेवून ही फोटोग्राफी करणे आवश्यक आहे. फोटोग्राफी वैशिष्टयपूर्ण व्हावी यासाठी मन ओतून काम करणे गरजेचे आहे. पक्षांचे फोटो काढतांना थेट त्यांचेपर्यंत जावू नये. वन्यजीवांचे छायाचित्र काढतांनादेखील आपण त्या प्राण्यांकडे न जाता ते आपल्या जवळ येतील अशापध्दतीने फोटोग्राफी करावी. जिथे आपण फोटोग्राफी करणार आहोत त्या भागातील स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तंत्रशुध्दपध्दतीने वन्यजीव फोटोग्राफीबाबत काही टिप्स दिल्या. त्यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांबाबत विस्तृत माहिती देखील दिली.
                    वर्कशॉपला निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे, के.टी.एसचे वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, सेवानिवृत्त सहायक वनरक्षक अश्विन ठक्कर,  सातपुडा फाऊंडेशनचे मुकुंद धूर्वे, सेवा संस्थेचे सावन बहेकार, हिरवट संस्थेचे रुपेश निबांर्ते, चेतन जसानी, भारत जसानी, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, पत्रकारबांधव यांचेसह गोंदिया, भंडारा, नागपूर, बालाघाट येथील हौसी छायाचित्रकार या वर्कशॉपला उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन मुकुंद धूर्वे यांनी तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.
                                                             0000000000000

No comments:

Post a Comment