जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 18 April 2018

शाश्वत विकासातून घोगरा आदर्श करणार - आ.विजय रहांगडाले

घोगरा येथे ग्राम स्वराज्य अभियान सभा
• केंद्राच्या विशेष प्रतिनिधींचा ग्रामस्थांशी संवाद


    जिल्ह्यातील तीन गावांची निवड सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने करण्यात आली आहे. गावे ही विकासाचा कणा आहे, त्यामुळे गावाचे मागासलेपण दूर झाले पाहिजे. घोगरा या गावाचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून शाश्वत विकासातून हे गाव आदर्श करणार असल्याची ग्वाही आमदार विजय रहांगडाले यांनी दिली.
        18 एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या विशेष प्रतिनिधींनी गावाला भेट देवून संवाद साधला. यानिमित्ताने आयोजित‍ कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्री.रहांगडाले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. यावेळी केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक श्रीमती फरीदा नाईक, संरक्षण मंत्रालयाचे अवर सचिव जितेंदर कुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, पं.स.उपसभापती मनोहर राऊत, घोगरा सरपंच गीता देव्हारे, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) राजेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(महिला व बालकल्याण) भिमराव पारखे, तहसिलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद ईनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री.काळे म्हणाले गावांचा विकास करतांना काही प्रातिनिधीक गावे तयार करावी लागतात. सात निकषांच्या आधारे जिल्ह्यातील तीन गावांची निवड करण्यात आली आहे. 5 मे पर्यंत सात योजनांचा लाभ या तीन गावातील ग्रामस्थांना देण्यात येणार असून ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
       श्री.दयानिधी म्हणाले, गावातील प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा. रोगराई टाळण्यासाठी प्रत्येकाने घर व परिसर स्वच्छ ठेवावा. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी. जिल्ह्यातील शेअरींग व नादुरुस्त शौचालयाचा आकडा शुन्यावर आणण्याचा मानस व्यक्त करुन त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती डॉ.दयानिधी यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे व सरपंच श्रीमती देव्हारे यांनी गावातील विकास कामे व समस्यांची माहिती देवून आपले विचार व्यक्त केले.
       घोगरा गावात ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत भेटीसाठी आलेल्या केंद्र सरकारच्या विशेष प्रतिनिधींचे आगमन झाल्यानंतर भिमनगर येथे घरकुल बांधकाम तसेच शेअरींग शौचालयाचा वापर करणाऱ्या महिलेकडे शौचालय बांधकामाचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या कामावर 100 टक्के उपस्थित राहून काम करणाऱ्या तीन महिलांचा याप्रसंगी प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
        केंद्र सरकारचे विशेष प्रतिनिधी श्रीमती नाईक व जितेंदर कुमार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील उपलब्ध असलेल्या सुविधा, शाळा व अंगणवाडीची सुविधा याबाबतची माहिती जाणून घेतली. गावातील सर्व महिलांचे बँक खाते असले पाहिजे. गावात स्वच्छता राखण्यास कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात. पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आहाराबाबत माहिती जाणून घेतली.
       महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत गावात 15 महिला बचतगट स्थापन केले असून 11 गटांना लिंकेज करण्यात आले आहे. या गटांना फिरता निधी देण्यात आला आहे. 16 लाख 15 हजार रुपये गावातील बचतगटांच्या महिलांच्या खात्यात जमा आहे. बचतगटातील अनेक महिला शेतीवर आधारीत व्यवसाय करीत असून प्रामुख्याने शेळी, गाय, म्हैस पालन, किराणा व्यवसाय करतात. गावातील 140 महिलांकडे गॅस कनेक्शन असून 60 महिलांना या अभियाना दरम्यान गॅस कनेक्शन मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केल्याची माहिती बचतगटांच्या सहयोगीनी यांनी यावेळी दिली.

       श्रीमती नाईक व जितेंदर कुमार यांनी अंगणवाडीला भेट देवून ग्रोथ चार्ट बालकांना, स्तनदा मातांना व गर्भवती मातांना देण्यात येणाऱ्या आहाराची पाहणी केली व अंगणवाडी सेविकेशी संवाद साधला. आरोग्य उपकेंद्राला भेटी प्रसंगी रुग्णांना येथून उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवेबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी घोगरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment