जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 8 April 2018

लोकराज्यचा ‘महामानवाला अभिवादन’ विशेषांकाचे जिल्हाधिकारी काळे यांच्या हस्ते प्रकाशन


    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमीत्त माहिती व  जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या महामानवाला अभिवादन या लोकराज्यचा एप्रिल महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते आज 8 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्रा.धर्मशील चव्हाण, बार्टीचे सहायक प्रकल्प संचालक (समतादूत) रिदय गोडबोले प्रामुख्याने उपस्थित होते.
      श्री.काळे म्हणाले, डॉ.आंबेडकर हे जागतिक किर्तीचे विचारवंत होते. त्यांनी समाजातील शोषित पिडीत वंचित घटकांच्या कल्याणासाठी कार्य केले. लोकराज्यचा महामानवाला अभिवादन या विशेषांकामध्ये अत्यंत चांगले लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
     महामानवाला अभिवादन या लोकराज्यच्या विशेषांकात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिथी संपादकीयमध्ये असामान्य व अद्वितीय असे वर्णन डॉ.आंबेडकरांचे केले आहे. सामाजिक परिवर्तनाला दिली नवी दिशा यामधून राजकुमार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. हक्क, अधिकार आणि दिले आत्मभान या लेखामधून राजकुमार बडोले यांनी डॉ.आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सर्वांना समान न्याय, इतिहास तज्ञ डॉ.जयसिंगराव पवार यांचा राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यावर लेख, याशिवाय परिवर्तनाचे अग्रदूत, जलनीतीचे उदगाते, ऊर्जाशक्तीला चालना, उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक, बाबासाहेबांचा जयंती आणि कोणी सुरु केली, महामानवाचा स्मृतीगंध, ग्रंथकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बुध्दीवादाची प्रेरक शक्ती, शिक्षणाची मुहूर्तमेढ, शांततामय सहजीवनाचे हमीपत्र, महामानवाचा जीवनपट, समतेचा उदगाता, प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे तीर्थस्थळे, सुरक्षेचा प्रहरी, नव्या संधी प्रगतीच्या, दलित साहित्याचा आधारवड या विविध विषयांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर लेखकांनी प्रकाश टाकला आहे. याशिवाय अर्थसंकल्प विशेष, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, रोजगार निर्मिती व उद्योजक चालना, तसेच अन्य विषयांवर सुध्दा लेखन या विशेषांकात करण्यात आले आहे.
     या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह व निवासी शाळेचे विद्यार्थी, बार्टीचे समतादूत, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment