जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 18 February 2018

समृध्द शेतीसाठी शेतीचे प्रयोग गावापर्यंत पोहोचवा - पालकमंत्री राजकुमार बडोले




गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सवाचे उदघाटन
                                • सेंद्रीय तांदूळाचे प्रदर्शन व विक्री
                                • यांत्रिकीकरण व शेतीविषयक तज्ञांकडून मार्गदर्शन
                                • बचतगटांच्या उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्री
                                • पशुपक्षांचे प्रदर्शन
      जिल्ह्यात औद्योगिकीकरण झाले नसल्यामुळे जिल्हा मागास आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक देखील कमी आहे. मात्र निसर्गाने जिल्ह्याला भरभरुन दिल्यामुळे जल व वन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. जिल्ह्याच्या पारंपारिक शेतीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता प्रगत कृषि तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीच्या समृध्दीसाठी नवनविन कृषिविषयक प्रयोग गावापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      18 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा, कृषि विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त वतीने आयोजित पाच दिवशीय गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले. यावेळी ते बोलत होते. मंचावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, गोंदिया शेतकरी उत्पादक संघाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, गोरेगावच्या माजी पं.स.सभापती चित्रलेखा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, विरेंद्र जायसवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, जगात सर्वात जास्त शिक्षणाची गरज आज कृषि क्षेत्रात आहे. शेतीसाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रगत देशातील शेतीवरुन लक्षात येईल. अशाप्रकारच्या प्रदर्शनाच्या प्रयोगातून अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. बचतगटातील महिला हया चांगल्याप्रकारे विविध वस्तुंचे उत्पादन करीत आहे. उत्पादीत मालाची चांगली पॅकींग व मार्केटिंग केली तर चांगली बाजारपेठ त्यांना मिळू शकते असे त्यांनी सांगितले.
      कमीत कमी जागेत जास्तीत जास्त धानाचे उत्पादन घेता आले पाहिजे यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, शेतकऱ्यांनी आता जागतिक तंत्रज्ञानाशी जोडून घेतले पाहिजे, तरच शेतीवरचा भार कमी होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी मातीची आरोग्य तपासणी केली तर त्याला मातीत असलेली कमतरता व कोणते उत्पादन त्या शेतीमधून घ्यावयाचे आहे हे लक्षात येईल. केवळ धानपिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी आता शेतीपुरक उद्योगाकडे वळले पाहिजे व त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे. जिल्ह्यात राईस पार्क सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्जुनी/मोरगाव येथे नुकतीच केल्यामुळे कृषि संशोधन, प्रक्रिया व विविध प्रकारच्या धानाच्या प्रजातीतून जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होणार असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी समृध्द होण्यास मदत होणार आहे.
      तुटतुडा व मावामुळे ज्या धानपिकाचे नुकसान झाले आहे तसेच गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना देखील निश्चित मदत करण्यात येईल असे सांगून श्री.बडोले म्हणाले, आता उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करुन दुष्काळ निश्चित करण्यात येतो. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात बदल करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व शेतकऱ्यांनी तसेच बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची विक्री व्हावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीच्या गटांनी सुध्दा उत्पादित केलेला सेंद्रीय तांदूळ विक्रीसाठी या प्रदर्शनात उपलब्ध आहे. सेंद्रीय शेतीत रोगराई येत नाही. जिल्ह्यातील उत्पादीत सेंद्रीय तांदूळ गोंदिया ब्रँड म्हणून विकसीत करुन मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या शहरात मोठ्या   मॉलमधून चांगल्याप्रकारे विकला जाईल असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी शेतकऱ्यांनी निष्ठेने सेंद्रीय शेती करावी असे आवाहन केले.
       श्री.दयानिधी म्हणाले, शेतीच्या विकासाच्या दृष्टीने ज्या विविध योजना आहेत त्या योजनांची माहिती शेतकऱ्यांनी करुन घ्यावी व त्या योजनांचा लाभ घ्यावा. अनेक शेतकरी कृषिविषयक योजनांचा चांगल्याप्रकारे लाभ घेतात. या प्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची जास्तीत जास्त नागरिकांनी खरेदी केली पाहिजे. त्यामुळे शेतकरी व बचतगटातील महिलांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी रेखलाल टेंभरे यांनी देखील मार्गदर्शन केले.
      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवात लावण्यात आलेल्या कृषिविषयक सेंद्रीय तांदूळाच्या स्टॉलला, भाजीपाला स्टॉल, बियाणे स्टॉल, बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंच्या स्टॉलला तसेच अन्य स्टॉलला देखील पालकमंत्री व मान्यवरांनी भेट दिली.
      पशु व पक्षी प्रदर्शनात शादाब गोटफार्म हिरडामाली यांनी बरबरी, तोतापरी, जमनापारी, बिटल, सोजत या बकऱ्यांच्या जाती, गिर, सेहवाल व अन्य देशी गाई तसेच कडकनाथ, गिरीराज व अन्य प्रजातीच्या कोंबड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहे. तसेच कृषि विभागाने देखील विकसीत वसुंधरा पाणलोट, अन्य कृषिविषयक प्रदर्शने लावली आहे.
     उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. संचालन तालुका कृषि अधिकारी घनश्याम तुमडाम यांनी केले. उपस्थितांचे आभार उपसंचालक अश्विनी भोपळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, बचतगटातील महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment