जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 24 March 2018

दिव्यांग बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- महादेव जानकर

राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन




दिव्यांग व्यक्तीच्या अंगी सुप्त गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी राज्यात   दिव्यांगासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांनी आपल्याला कधीही कमी लेखू नये. कारण दिव्यांग व्यक्ती सुध्दा प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करुन यश संपादन करु शकतात. आपला कुणी वाली नाही असे दिव्यांग बांधवांनी मनात विचार ठेवू नये.   दिव्यांग बांधवांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच अपंग कल्याण आयुक्तालय पुणे द्वारा आयोजित कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी यांच्या संयुक्त वतीने 24 मार्च रोजी तालुका क्रीडा संकुल देवरी येथे दिव्यांगांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री.जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. यावेळी आमदार संजय पुराम, अपंग कल्याण विभागाचे आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, जि.प.उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अली, देवरी नगराध्यक्षा सुमन बिसेन, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेशराम सोनबोईर, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      श्री. जानकर पुढे म्हणाले, दिव्यांगांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी राज्यातील मोठ्या शहरात या क्रीडा स्पर्धा न घेता गोंदिया जिल्ह्यातील देवरीसारख्या अतिदुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहेत त्याबद्दल त्यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांना धन्यवाद दिले. गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना 3 टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. स्कील डेव्हलपमेंट इंडिया मिशनच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले.
      पालकमंत्री श्री.बडोले म्हणाले, शासनाने देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात दिव्यांगांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले त्याबद्दल त्यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले. अपंग बांधवांच्या विकासासाठी ग्रामपंचायत निधीत 3 टक्के निधी खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना 20 टक्के ज्यादा गुण देण्याचा निर्णय सुध्दा राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील 123 शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भातील निर्णय सुध्दा राज्य शासन महिन्याभरात घेईल असे यावेळी आश्वासन दिले. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधीनी निर्माण करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरु आहे. दिव्यांग बांधवांनी आपल्याला कमी लेखू नये कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वसामान्य माणसारखे दिव्यांगांनी जगावे असा शासनाचा मानस आहे. दिव्यांग बांधवांना कशा पध्दतीने नोकऱ्या देता येतील याबाबत शासन विचार करीत आहे. दिव्यांग बांधवांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      आमदार पुराम म्हणाले, दिव्यांग बांधवांनी आपल्याला कधीही कमी समजू नये. अशाच क्रीडा स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले खेळाडू निर्माण होतील असे सांगितले. 
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अशा देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत आहेत याचा जिल्ह्यातील नागरिकांना अभिमान आहे. गोंदिया जिल्हा हा निसर्गसंपन्न जिल्हा असून निसर्गाने जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. गोंदिया हा संपूर्ण महाराष्ट्राला तांदूळ पुरविणारा जिल्हा आहे. एकमेकांना सोबत घेवून दिव्यांग व्यक्ती सुध्दा सर्वसामान्य मागणाप्रमाणे क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून यशस्वी होवू शकतात असे त्यांनी सांगितले.
       या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय दिव्याग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधूदुर्ग, जळगाव, धुळे, नंदूरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडा स्पर्धक सहभागी झाले होते.
     कार्यक्रमास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, तहसिलदार विजय बोरुडे, माजी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, विरेंद्र अंजनकर, अनिलकुमार येरणे, रामलाल चौधरी, जयश्री येरणे, उपदेश लाडे, कुलदिप लांजेवार, मनोज भुरे, आशिष खतवार तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     प्रास्ताविक अपंग कल्याण विभागाचे आयुक्त नितीन पाटील यांनी केले. संचालन जवाहर गाढवे यांनी केले. उपस्थितांचे आभार कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे यांनी मानले.
                                                                                00000



No comments:

Post a Comment