जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 12 July 2017

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळी पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमीपूजन पालकमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सींग संवाद






             सडक/अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे 10 जुलै रोजी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार, वर्ल्ड बँकेचे टास्क टिम रिडर राहावा नीती उपस्थित होते.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात ई-भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, गोंदिया सारख्या मागास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पुतळी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या 16 गावातील ग्रामस्थांची पाणी समस्याची सोडवणूक करण्यास या भूमीपूजनामुळे मदत होणार आहे. या गावातील नागरिक बऱ्याच दिवसापासून शुध्द व स्वच्छ पाण्यासाठी व्याकूळ होते, आता या ई-भूमीपूजनामुळे पाण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितले.
         जिल्हाधिकारी कार्यालयात ई-भूमीपूजन कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सतीश सुशीर, कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे, उपअभियंता प्रदिप वानखेडे, शाखा अभियंता निशीकांत ठोंबरे, उपअभियंता राजेश मडके, उप कार्यकारी अभियंता श्रीमती सारवी, सहायक अभियंता श्री.नगराळे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कृष्णा जनबंधू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील विविध विभागातील 171 पाणीपुरवठा प्रकल्पाचे एकाचवेळी ई-भूमीपूजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शुध्द पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. ग्रामीण भागाला पिण्याचे शुध्द पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून 1003 नळ पुरवठा योजना व 83 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाची कामे हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

       पुतळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा लाभ सडक/अर्जुनी तालुक्यातील 16 गावे व 18 वाड्यांना होणार आहे. यामध्ये कोहलीपार, कन्हारपायली, सायलीटोला, पाटीलटोला, पाथरटोला, कोहमारा, बेघरटोली, कोयलारी, कोहळीटोली, मोहघाटा, पांढरवाणी, महारटोला, पुतळी, नरेटीटोला, रेंगेपार, कुलारटोला, मोकाशीटोला, कन्हारटोला, नवाटोला, बेघरटोला, उशीखेडा, सडक/अर्जुनी, दल्ली, लेंडीटोला, बोंडकीटोला, हलबीटोला, जीराटोला, सलंगटोला, डव्वा, घोटी, म्हसवाणी, चिरचाळी व गोंगले या गाव व वाड्यांना होणार आहे. या योजनेच्या कामाची किंमत 11 कोटी 32 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. ही पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतर दरडोई 55 लिटर पाणी रोज उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पुतळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment