जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 18 October 2017

कर्जमाफीमुळे मिळेल प्रगतीला चालना मुन्नीबाईने व्यक्त केल्या भावना

         राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि दिवाळीच्या मुहूर्ताचे औचित्य साधून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. गोंदियासारख्या मागास, दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या जिल्ह्यातील देवरीसारख्या नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी भागातील धान उत्पादक छोट्या शेतकऱ्याला सुध्दा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
        देवरी तालुक्यातील सालई या आदिवासी गावातील मुन्नीबाई राऊत या विधवा महिलेला देखील आजच्या कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात प्रमाणपत्र देण्यात आले. दोन वर्षापूर्वी म्हणजे 7 मे 2014 रोजी तिच्या पतीचे निधन झाले. अल्पभूधारक असलेल्या तिच्या पतीवर आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे बोरगाव(बाजार)चे 13061 रुपयाचे कर्ज होते. घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मुन्नीबाई हताश झाल्या होत्या. पावसाच्या पाण्यावर अर्थात निसर्गावर अवलंबून राहून धान पीक घेणाऱ्या मुन्नीबाई आर्थिक विवंचनेत सापडल्या होत्या. पतीच्या निधनानंतर पतीवर असलेले सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे याच चिंतेत त्या सातत्याने असायच्या. एक मुलगा 12 वीत तर मुलगी 11 वी शिक्षण घेत असतांना कर्जाची परतफेड कशी करावी याच चिंतेने त्या ग्रासल्या होत्या. मुलामुलींच्या पुढील शिक्षणासाठी पैसा आणावा तरी कुठून, आधीच आपण कर्जबाजारी आहोत याच विवंचेने त्या सातत्याने असायच्या.
        राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांवर दीड लाख रुपये कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि देवरीसारख्या राज्याच्या टोकावर असलेल्या तालुक्यातील दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील सालई येथील मुन्नीबाई राऊत या महिला शेतकऱ्याला या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला.
      स्वत:च्या शेतात राबणारी मुन्नीबाई घरच्या शेतीत कामे नसतांना रोजगार हमी योजनेच्या कामावर जायची. कर्जापायी शेती करण्याची इच्छाच तिने सोडून दिली होती. निसर्गावर अवलंबून शेती करणे म्हणजे शेतकरी हा संकटात राहूनच आपला जीवन जगतो अशी भावना तिने व्यक्त केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असण्याची प्रचिती मुन्नीबाईला आली. तिच्यावर असलेले सोसायटीचे 13061 रुपयांचे कर्ज या योजनेमुळे माफ झाले. आता कर्जमाफी झाल्यामुळे माझ्या दोन्ही मुलामुलींना चांगले शिक्षण देवून त्यांना नोकरीच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करायला लावणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुन्नीबाई कर्जमाफीचे प्रमाणपत्र घेत असतांना तिच्या चेहऱ्यावर कर्जमाफीचा आनंद ओसंडून वाहत असल्याची भावना तिने व्यक्त केलेल्या मनोगतातून दिसून आल्या. या कर्जमाफीमुळे आता प्रगतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास तिने व्यक्त केला.

No comments:

Post a Comment