जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 11 October 2017

आहारात सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करा - अभिमन्यू काळे



पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चाखली सेंद्रीय भाताची चव
      शेतातील पिकांवर रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खते व किटकनाशके मारण्यात येत नव्हती त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
      कारंजा येथील पोलीस मुख्यालयात 10 ऑक्टोबर रोजी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)च्या वतीने पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी सेंद्रीय तांदूळापासून शिजवलेला भात खावू घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी काळे बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, आज आपण डॉक्टरकडे गेलो तर तपासणीसाठी 100 ते 200 रुपये फी लागते. दुर्दैवाने कोणी आजारी पडले तर 2 ते 4 हजार रुपये कमीत कमी खर्च येतो. स्वस्तातील अन्न खाल्ल्यामुळे दवाखान्यात जावे लागते. स्वत:च्या प्रकृतीकडे आपण खाण्याच्या सवयीमुळे दुर्लक्ष करतो. आज जगभर सेंद्रीय अन्नधान्याची मागणी वाढत आहे. महिलांनी सुध्दा कुटूंब प्रमुखाकडे सेंद्रीय शेतीतील उत्पादीत मालासाठी आग्रह धरावा असे त्यांनी सांगितले.
      डॉ.भूजबळ म्हणाले, सेंद्रीय तांदूळाचा दैनंदिन आहारात वापर व्हावा यासाठी प्रचार-प्रसाराचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आहारात विषमुक्त अन्न काळाची गरज आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे दुष्परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अशा किटकनाशक व खतांवर बंदी आली पाहिजे, असे ते म्हणाले.
       दररोज अन्नाच्या माध्यमातून विष खाण्यात येत असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, पोलीस कुटूंबातील सर्वजण निरोगी राहण्यास सेंद्रीय शेतीतून उत्पादीत अन्न खाणेसुध्दा काळाची गरज झाली आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना यांचेसह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आत्माचे सचिन कुंभार यांनी केले. उपस्थितांचे आभार हिंदूराव चव्हाण यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment