जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 11 October 2017

शिबिराचा लाभ पोलीस व कुटूंबातील सदस्यांनी घ्यावा - डॉ.दिलीप पाटील-भूजबळ



     पोलीसांची नोकरी ही अत्यंत ताणतणावाची आहे. पोलीसांना आपल्या कर्तव्याप्रती    24 तास दक्ष राहावे लागते. आपले कर्तव्य बजावतांना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनी घ्यावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
      कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात 10 ऑक्टोबर रोजी इंपथी फाउंडेशन मुंबई व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आयोजित महाराष्ट्र पोलीस कल्याण कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांकरीता नि:शुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन करतांना डॉ.भूजबळ बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना, इंपथी फाउंडेशन मुंबईचे भगतसिंग पवनार, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुरेश भवर, डॉ.एन.ओ.झाडे, डॉ.सुहास सावंत, इंपथीचे समन्वयक दिनेश मोरे, स्वामी समर्थ नेत्रालय नागपूरचे मोहन खराबे, डॉ.श्वेतल मस्करी, डॉ.अरुण दुधाने यांची उपस्थिती होती.

       डॉ.भूजबळ यावेळी म्हणाले, शिबिरातून आरोग्य तपासणी सोबतच वैद्यकीय सल्ला सुध्दा घ्यावा. त्यामुळे पुढील उपचारासाठी मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवशीय नि:शुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात नेत्र तपासणी, औषधी वाटप, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 40 वर्षावरील महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाची तपासणी आणि स्त्री रोग तपासणी करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स हे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि कुटूंबातील सदस्य यांची तपासणी करणार आहे. उदघाटन कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment