जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 5 April 2019

निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांची तिरोडा येथे प्रशिक्षण वर्ग व स्ट्राँग रुमला भेट

        भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी आज 5 एप्रिल रोजी तिरोडा येथे भेट दिली व तेथे सुरु असलेल्या मतदान पथक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मार्गदर्शन केले. तिरोडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुमला भेट देवून पाहणी केली.
         तिरोडा येथील स्नेहल टॉकीजमध्ये आयोजित मतदान पथकाच्या प्रशिक्षणाला भेट देवून डॉ.मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले मतदान पथकांनी योग्यप्रकारे आणि काळजीपूर्वक निवडणूकीचे काम करावे. निवडणूकीच्या कामात हयगय होता कामा नये. हे काम जबाबदारीने पार पाडावे असे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.
      शहिद मिश्रा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला भेट देवून त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्यात असे सांगितले. यावेळी तहसिलदार संजय रामटेके यांची उपस्थिती होती.
       शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स ठेवण्यात आलेल्या सीलबंद स्ट्राँग रुमची पाहणी करुन काही सूचना तहसिलदार श्री.रामटेके यांना दिल्या. या विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्र, एकूण मतदार, स्त्री-पुरुष मतदार, नव्यानेच नोंदणी झालेले युवा मतदार आणि दिव्यांग मतदारांबाबतची माहिती डॉ.मिश्रा यांनी जाणून घेतली.

No comments:

Post a Comment