जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 10 April 2019

11 एप्रिल रोजी निवडणूक : मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना

Ø   14 उमेदवार भाग्य आजमावणार
Ø      18 लाख 8 हजार 948 मतदार बजावतील मतदानाचा हक्क
Ø      गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान
Ø      अर्जुनी/मोरगाव मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान
Ø   मतदानासाठी 2184 मतदान केंद्र
Ø   निवडणूकीसाठी 13 हजार मनुष्यबळ




17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षासह 14 उमेदवार या निवडणूकीत आपले भविष्य आजमावणार आहेत. गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा या विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान, तर अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 2184 मतदान केंद्रावर 18 लाख 8 हजार 948 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये  9 लाख 5 हजार 490 पुरुष मतदार आणि 9 लाख  3 हजार 458 स्त्री मतदारांचा समावेश आहे.
मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) बुधवारी मतदान केंद्रासाठी रवाना झाली आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुकूंद टोणगावकर, साकोली विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनिषा दांडगे, अर्जूनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा सोनाळे, गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंत वालस्कर व तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गंगाराम तळपाडे यांनी मतदान साहित्य देवून मतदान पथकांना रवाना केले.
गुरुवार 11 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या निवडणूकीत भंडारा-गोंदिया जिल्हयातील 18 लाख 8 हजार 948 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2184 मतदान केंद्रावर  हे मतदान होणार असून यासाठी 3644 बॅलेट युनिट, 2671 कंट्रोल युनिट व 2909 व्हिव्हिपॅट यंत्र वापरले जाणार आहेत.
·         निवडणूकीसाठी असलेले मनुष्यबळ
भंडारा-गोंदिया मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्हयात 1211  मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून 6260 अधिकारी कर्मचारी  तर गोंदिया जिल्हयासाठी 973 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून 4279 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. निवडणूकीच्या कामासाठी सहाही विधानसभा मतदार संघात  पोलीस कर्मचाऱ्यांसह १३ हजार २९२ अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने व शांततेने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शांतनू गोयल , गोंदिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, गोंदिया पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले आहे.                                                                                                                          ·         सखी व आदर्श केंद्र
लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा, साकोली व तुमसर क्षेत्रात 7 मतदान केंद्रावर तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 7 मतदान केंद्रावर महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. या सोबतच आयोगाने आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.  
* मतदानासाठी सुट्टी
        11 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी  सुट्टी जाहिर करण्यात आली  आहे. ज्या गावामध्ये  मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार आहे तो बंद ठेवण्यात येणार आहे. सुट्टी ही मतदान करण्यासाठी असून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच अन्य कामासाठी जावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
·         मतदान केंद्रावर सुविधा
निवडणूक आयोगाने यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीत महिला व दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करुन देवून मतदान केंद्राव रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गरोदर महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी सहकार्य व प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठीच्या उपाय योजना कराव्यात. भरपूर पाणी प्यावे, रुमाल बांधावा, सावलीचा आधार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
·         निवडणूक लढत असलेले उमेदवार
नाना पंचबुध्दे-राष्ट्रवादी, विजया नांदूरकर-बहुजन समाज पाटी, सुनिल बाबुराव मेंढे-भारतीय जनता पार्टी, कारु नागोजी नान्हे-वंचित बहुजन आघाडी, भिमराव दुर्योधन बोरकर- पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, भोजलाल मरसकोल्हे-भारतीय शक्ती चेतना पार्टी तर अपक्ष निलेश कलचूरी, प्रमोद गजभिये, विरेंद्रकुमार जसवा, देविदास लांजेवार, राजेंद्र पटले, सुनिल चवळे, सुमित पांडे व सुहास फुंडे असे एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत.
·         मतदानाचे आवाहन
            मतदान करणे केवळ हक्क नसून कर्तव्य आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रतयेकाने मतदान करण्याचा संकल्प करावा. लोकसभेसाठी पाच वर्षातून एकदा येणाऱ्या मतदानाच्या संधीचे मतदान करुन सोने करा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान दयावे, असे आवाहन मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा व जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
·         एकूण मतदार

विधानसभा मतदार संघ
मतदान केंद्र
पुरुष मतदार
स्त्री मतदार
 इतर
एकूण
60-तुमसर
358
151709
147636
00
299345
61-भंडारा
458
183838
183920
00
367758
62-साकोली
395
160319
156271
00
316590
63-अर्जूनीमोर
317
127557
125257
02
252816
64-तिरोडा
295
126277
128424
00
254701
65-गोंदिया
361
155790
161948
00
317738
एकूण
2184
905490
903456
02
1808948

                                         

No comments:

Post a Comment