जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 28 May 2018

नक्षलग्रस्त भरनोलीत 74 टक्के मतदान



 
                                                  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक
    भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी आज 28 मे रोजी मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व दुर्गम भागात असलेल्या भरनोली या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील गावात 74 टक्के मतदान झाले.
        रखरखत्या उन्हात भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदार मतदान करतांना उत्साहीत दिसत होते. विशेष म्हणजे हा भाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्यामुळे मतदानाची वेळ अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत होती. भरनोली येथील 305 क्रमांकाच्या एकमेव मतदान केंद्रावर 537 पुरुष आणि 506 स्त्रिया अशा एकूण 1043 मतदारांचा समावेश होता. त्यापैकी दुपारी 3 वाजतापर्यंत 384 पुरुष आणि 383 स्त्री अशा एकूण 767 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 74 टक्के इतकी आहे.
      भरनोली येथील मतदान केंद्रावर भरनोली, बल्लीटोला, शिवरामटोला, बोअरटोला व तिरखुरी या गावातील मतदारांनी रखरखत्या उन्हात आडवळणावर असलेल्या आपल्या गावावरुन येऊन मतदान केले. विशेष म्हणजे भरनोली येथील श्रीमती भागरथा कराडे (वय 90 वर्ष) व श्रीमती जनको कुमरे (वय 85 वर्ष) यांनी देखील आपल्या नातवंडांचा आधार घेवून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
       भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील नक्षलदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या भरनोली येथील मतदान केंद्रावर वरील 5 नक्षलग्रस्त गावातील मतदारांनी येवून व मतदान केंद्रावरील रांगेत उभे राहून मोठ्या प्रमाणात मतदान केले. यावरुन या भागातील लोक नक्षलवादाला कंटाळले असून त्यांचा लोकशाहीवरच विश्वास असल्याचे केलेल्या मतदानावरुन स्पष्ट झाले आहे. देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वात मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

No comments:

Post a Comment