जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 9 May 2018

मुरदोलीच्या रोपवाटिकेत 2 लाख 72 हजार विविध प्रजातीचे स्वदेशी रोपटे तयार



स्वदेशी वृक्ष लागवडीला मिळणार चालना
       वाढत्या जागतिक तापमानामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनांचे अर्थात वृक्षांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. राज्यात जास्तीत जास्त क्षेत्र वृक्ष लागवडीखाली यावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या पावसाळ्यात राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. 2019 पर्यंत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी विविध ठिकाणी रोपवाटिकेतून रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 31 लक्ष विविध प्रजातीचे रोपटे लावण्यात येणार आहे.
      वन विभागाने रोपटे निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील वन विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत रोजगार हमी योजनेतून 2 लाख 72 हजार 115 विविध प्रजातीच्या रोपट्यांची निर्मिती केली आहे. विशेषकरुन या रोपवाटिकेत स्वदेशी रोपट्यांची लागवड करण्यात आलेली आहे. स्वदेशी रोपटे लागवड करण्यामागचा उद्देश वन्यपक्षी व प्राण्यांना या झाडांचे फळ खाद्य म्हणून त्यांच्या अन्नसाखळीचा भाग होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षांना विविध प्रजातींच्या झाडांची मधुर फळे चाखायला मिळणार आहेत.
      जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्वदेशी वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध रोपवाटिकेत स्वदेशी वृक्षांची रोपटे तयार करण्यात आली आहे. मुरदोली येथील रोपवाटिकेत साग-79784, बांबू-12366, हिरडा-2000, बेल-4260, खैर-5220, आवळा-470, मोह-4780, सिवन-9510, कडूलिंब-2870, शिसू-25810, कवट-7280, आंजन-10680, बिजा-10, जांभूळ-21140, सिताफळ-12280, पुत्रजिवा-70, चिंच-1000, बेहडा-11395, पारसपिंपळ-9790, सिंदूर-3320, सिसम-2700, अमलतास-8810, रिठा-510, चिचवा-1770, पांढरा सिरस-5480, करु-170, मोहई-2300, आपटा-740, वड-3400, पिंपळ-760, आंबा-1810, चारोळी-10, साजा-1370, बादाम-180, गुलमोहर-580, अशोक-710, गराडी-70, कोजब-540, उंबर-20, तेंदू-20, सावर(काटेरी)-390 अशा एकूण 2 लाख 72 हजार 115 विविध प्रजातीच्या रोपट्यांची निर्मिती या रोपवाटिकेत करण्यात आली आहे.
     विशेषत: मुरदोली येथील रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी हार्डलिंग चेंबर, मिस चेंबर, लोखंडी स्टँड, रुट ट्रेनर ब्लॉक इत्यादी साहित्याचा वापर करुन बियाण्यांचे 100 टक्के अंकुरण करण्यात आले आहे. या रोपवाटिकेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वड-3400, पिंपळ-760 असे एकूण 4160 रोपे तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत भविष्यात अधिकाधिक रोपे तयार करण्यात येणार आहे. दुर्मिळ वनस्पती व नामशेष होणाऱ्या वनस्पतींच्या बियांपासून करु व तेंदूची रोपे तयार करण्यात येत आहे. बिबा, चारोळी, पिंपळ, वड, उंबर यांची रोपटे देखील तयार करण्यात येत असल्यामुळे जैविक विविधता उपलब्ध तर झाली आहेच सोबतच पर्यावरणपुरक वातावरण देखील तयार झाले आहे. वनातील विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बिया एकत्र करुन या रोपवाटिकेत विविध प्रजातीची रोपटे तयार करण्यात येत आहे.
        2 लाख 72 हजार 115 रोपट्यांची निर्मिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आल्यामुळे रोपवाटिकेच्या परिसरातील ग्रामस्थांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. उपवनसंरक्षक एस.युवराज व सहायक वनसंरक्षक एन.एच.शेंडे यांच्या कुशल मार्गदर्शनात या रोपवाटिकेतून मोठ्या प्रमाणात भविष्यात स्वदेशी वृक्षांची रोपटे तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषि, सामाजिक वनीकरण, वन विभाग यासह अन्य विभागाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या रोपवाटिकेतून स्वदेशी रोपट्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येणार असल्यामुळे वन्यजीवांसाठी खाद्य उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment