जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 11 May 2018

लोकसभा पोटनिवडणूक : 26 ते 28 मे दरम्यान प्रतिबंध आदेश लागू


         भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने प्रसिध्द केला आहे. या निवडणूकीसाठी 28 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 31 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार असून 2 जून रोजी निवडणूक कार्यक्रम संपणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदानाच्या दिवसापासून 48 तासापूर्वी प्रचार कार्यक्रम संपणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 8 जानेवारी 2007 च्या आदेशान्वये मतदारसंघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरीता आलेले स्टार प्रचारक हे निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा मतदारसंघात राहिल्यास त्यांच्याकडून प्रचार मोहिम राबविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      अपर जिल्हादंडाधिकारी हरिश धार्मिक यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये 26 मे च्या सायंकाळी 6 वाजतापासून ते 28 मे च्या रात्री 12 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 26 मे च्या सायंकाळी 6 वाजतापासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरीता आलेले स्टार प्रचारक यांना गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात येत आहे. मतदार संघातील मतदार नसले आणि या मतदारसंघात निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना हा आदेश लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदयातील तरतूदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे अपर जिल्हादंडाधिकारी हरिश धार्मिक यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment