जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 8 August 2016

जिल्हा नील क्रांतीच्या दिशेने जिल्ह्यात 14 कोटी 25 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन




                                                                                        

          
     तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात पूर्वजांनी सिंचनासाठी माजी मालगुजारी तलाव बांधले. हे तलाव आजही सिंचनासोबत मत्स्य शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. जिल्ह्यातील ढिवर व आदिवासी बांधव मत्स्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून या तलावात मत्स्यशेती करीत आहे. जिल्ह्यातील तलावातील गोड्या पाण्यातून कटला, रोहू, मृग आणि सायप्रिनस या जातींच्या माशांचे उत्पादन घेण्यात येत आहे. जिल्ह्यात इटियाडोह प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रातील चायनीज हॅचरीतून या हंगामात 1 कोटी 94 लक्ष तर जिल्ह्यातील जवळपास 11 मत्स्य सहकारी संस्थांच्या तलावातून 12 कोटी 31 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांसोबतच खाजगीरित्या मत्स्य शेती करणाऱ्यांना इटियाडोह मत्स्यबीज केंद्र व मत्स्य सहकारी संस्थांकडून मत्स्यजीऱ्यांची विक्री करण्यात येत आहे. मत्स्यजीरे, मत्स्यबीज उत्पादन, बोटुकली ते मत्स्योत्पादनातून जिल्ह्याची निलक्रांतीकडे वाटचाल सुरु आहे.
          जिल्ह्यात 133 मत्स्य सहकारी संस्थांची नोंदणी असून त्यापैकी 124 संस्था कार्यरत आहे. या संस्थांचे जवळपास 11 हजार सक्रीय सभासद मासेमारीचा व्यवसाय करीत आहे. ही मासेमारी पाटबंधारे विभागाच्या 65 आणि जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या 1087 तलावातून करण्यात येत असून यासाठी 11 हजार हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध आहे.
          अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव जवळील इटियाडोह मत्स्यबीज केंद्राची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली व हे केंद्र 1978-79 मध्ये कार्यान्वीत झाले. या केंद्राचे एकूण क्षेत्र 12.95 हेक्टर इतके असून याचे जलक्षेत्र 4.82 हेक्टर आहे. यामध्ये संगोपन तळी 33, संवर्धन तळी 10 आणि संचयन तळी 4 अशी एकूण 47 तळी आहेत. येथील चायनीज हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात येते. या केंद्रातील शुध्द मत्स्यजीरे, मत्स्यबीजांची व बोटुकलींची विविध मत्स्य सहकारी संस्थांना विक्री करण्यात येते. 1 लाख मत्स्यजीऱ्याला 1500 रुपये शासन दराने विक्री करण्यात येते. इटियाडोह मत्स्यबीज केंद्रातून यावर्षी 1 कोटी 10 लक्ष मत्स्यजीऱ्यांची विक्री करुन या केंद्राला 1 लक्ष 72 हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
          जिल्ह्यात जवळपास 11 मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था हया तीनही बांध पध्दतीतून मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. यंदाच्या हंगामात या संस्थांनी शुष्क, ओलीत व मोगरा पध्दतीच्या बांधातून 12 कोटी 31 लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतले. मोगरा बांध पध्दतीतून कोसमतोंडी (सडक/अर्जुनी), भानपूर (गोंदिया), नवेगावबांध, माहुरकुडा, सोमलपूर व ताडगाव (अर्जुनी/मोर.), ओलीत बांध पध्दतीतून गिरोला (सडक/अर्जुनी) चान्ना/बाक्टी, माहुली खोडशिवणी (अर्जुनी/मोर.) तर शुष्क बांध पध्दतीतून खोडशिवणी, गिरोला, माहुली, चान्ना/बाक्टी येथील मत्स्य सहकारी संस्था मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. हया संस्था आपली गरज पूर्ण करुन इतर संस्थांना तसेच खाजगी मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्यजीऱ्यांची विक्री करतात.
          मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पथदर्शी प्रकल्प म्हणून 15 तलावात मत्स्यबीज संगोपन व संवर्धनासाठी तळी बनविण्यात येत आहे. या तळीचा उपयोग मत्स्यजीरे व मत्स्यबीज वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या संस्थांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. सोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकही वाढविण्यास मत्स्योत्पादनातून जिल्ह्याची नीलक्रांतीकडे वाटचाल सुरु आहे.
बांध पध्दतीतून मत्स्यजीरे निर्मिती
          जिल्ह्यात गोड्या पाण्यातून मासेमारी केली जाते. माशांकडे पोषक आहार म्हणून बघितले जाते. जिल्ह्यातील तलावातून रोहू, कटला, मृगळ व सायप्रिनस माशांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यातील तलावात असलेले प्राणी प्लवंमुळे तलावातील पाण्याची उत्पादकता वाढण्यास मदत होते.
          गोठणगाव जवळील मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रामध्ये चीनच्या तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेल्या चायनीज वर्तुळाकार हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांची निर्मिती करण्यात येते. सारख्याच वजनाच्या नर आणि मादी माशांना इंजेक्शनमधून संप्रेरक देवून उत्तेजीत केले जाते. नर व मादी माशांच्या मिलनातून मादी या उत्तेजनातून पोटातील अंडी पाण्यात सोडतात. त्यानंतर या अंड्यातून जीऱ्याच्या आकाराची माशांची पिल्ले बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना मत्स्यजीरे म्हटले जाते. नंतर चायनीज हॅचरीतून एकत्र केलेले मत्स्यजीरे संवर्धन व संगोपन तळीत सोडली जातात. या मत्स्यजीऱ्यांची मत्स्यबीज किंवा बोटुकलीपर्यंत म्हणजे बोटाच्या आकाराची होईपर्यंत संवर्धन व संगोपन तळीत वाढविली जातात. त्यानंतर त्यांना तलावात सोडण्यात येते.
          जिल्ह्यातील मासेमार ढिवर समाजबांधव हे पारंपारीक पध्दतीने माशांपासून मत्स्यजीरे तयार करतात. मोगरा, शुष्क व ओलीत बांध पध्दतीने मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. मत्स्यजीरे निर्मितीसाठी मोगरा बांध पध्दतीचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उपयोग केला जातो. मोगरा पध्दतीच्या बांधामध्ये तलावाच्या काठावर हा टाक्यासारखा मातीचा बांध तयार करुन त्यामध्ये पाणी सोडून नर आणि मादी माशांना इंजेक्शनमधून संप्रेरक देवून उत्तेजीत केले जाते. नर व मादीच्या मिलनानंतर मादी मासे आपल्या पोटातील अंडी या बांधमध्ये सोडतात. नंतर ही मत्स्यअंडी एकत्र करुन तलावात तयार करण्यात आलेल्या हाप्यामध्ये सोडण्यात येतात. 72 तासानंतर अंड्यांचे मत्स्यजीऱ्यात रुपांतर होते. नंतर ही हाप्यातील मत्स्यजीरे एकत्र करुन संवर्धन तळीत टाकण्यात येतात. तसेच हे मत्स्यजीरे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यांचा आकार मत्स्यबीज किंवा बोटुकलीचा झाल्यानंतर पाण्यात सोडण्यात येतात. शुष्क बांध पध्दतीतून कोरड्या छोट्या आकाराच्या तलावात पाणी भरुन परिपक्व नर-मादी माशांना जोडीने सोडतात. त्यानंतर पाण्याचा प्रवाह तलावात सोडण्यात येतो. नर व मादी उत्तेजीत होवून मिलनानंतर मादी अंडी सोडते. ही अंडी एकत्र करुन तलावात सोडली जातात यातून मत्स्यजीरे तयार होतात. ओलीत बांध पध्दतीतून नैसर्गीक पध्दतीने नर-मादीचे मिलन होवून मादीच्या अंड्यातून मत्स्यजीरे तयार होतात. अशाप्रकारच्या चार पध्दतीचा वापर जिल्ह्यात मत्स्यजीरे तयार करण्यासाठी केला जात आहे.
            



No comments:

Post a Comment