जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 16 August 2016

शेतकऱ्यांनो, शेतीला समृध्द करा - पालकमंत्री बडोले




गोंदिया,दि.16 : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जलयुक्तमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली असून संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारीक शेती करण्यापेक्षा नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला समृध्द करावे असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
            15 ऑगस्ट रोजी गंगाझरी येथे जलयुक्त शिवार अभियानातून बांधण्यात आलेला सिमेंट नाला बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, माजी आमदार हरीश मोरे, जि.प.सदस्य रमेश अंबुले, पं.स.सदस्य प्रकाश पटले, गंगाझरीच्या सरपंच ममता लिल्हारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भांडारकर, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री पुढे म्हणाले, पूर्वी आपण पारंपारीक पध्दतीने कडधान्य घेत होतो. पण आज विदेशातून कडधान्याची आयात करण्याची वेळ आली आहे. उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य वापर व त्याची देखभाल ग्रामस्थांनी करावी. पाणी हे जीवन आहे. पाणीसाठा कमी झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाची शेती करावी. यासाठी नवनविन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जिल्ह्यात तलाव, जंगल असतांना देखील आता आपण आपल्या मागासलेपणाची ओळख पुसली पाहिजे. अधिकारी व शेतकऱ्यांमधील दुरावा दूर झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी व ऐतिहासीक कार्यक्रम आहे. जलयुक्तच्या कामामुळे 94 पैकी 80 गावात जास्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. 25 हजार एकर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. यावर्षीपासून शेतकऱ्यांनी आता उडीद मुगाचे पिक घ्यावे. उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्याचा उपयोग रब्बी पिकासाठी करण्यात यावा. यामधून त्यांनी उडीद मुग पिकाची लागवड करावी. पाणीटंचाईपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी जि.प.सदस्य रमेश अंबुले, पं.स.सदस्य प्रकाश पटले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी सांगितले की, गंगाझरीत जलयुक्तमधून 40 कामे करण्यात आली आहे. या सिमेंट नाला बंधाऱ्यावर 9 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. 10 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. यामधून 18 हेक्टर शेतीच्या सिंचनाला पाण्याची उपलब्धता झाली आहे. गंगाझरी येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामातून 298 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे सडक/अर्जुनीच्या भागात धानपिकावर लष्करी अळीचा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून यासाठी औषधाचीही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            जलयुक्त शिवार अभियानात चांगले सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार देवराम भवरीया, सरपंच ममता लिल्हारे, कृषी सहायक आर.एस.तिबुडे, उपविभागीय कृषी अधिकारी एन.बी.नायनवाड, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.वाहणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गंगाझरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.वाहणे यांनी मानले.

                                                00000

No comments:

Post a Comment