जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 16 May 2017

रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करावी - राजकुमार बडोले

 
       मजूरीनिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यात रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत अनेक विकास कामे करण्याची क्षमता या योजनेत आहे. जिल्ह्यात या योजनेतून ग्रामविकास व वैयक्तीक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 15 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेत घेतला, यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, रोहयो अंतर्गत कामाचे नियोजन मोठ्या प्रमाणात दिसते, परंतू प्रत्यक्षात कामे कमी करण्यात येतात. प्रत्यक्षात जी कामे रोहयो अंतर्गत करायला पाहिजे ती होत नाही. तलावातील गाळ काढण्याचे नियोजन देखील रोजगार हमी योजनेतून करण्यात यावे. जी कामे आपण करणार आहोत ती दिर्घकाल टिकाऊ स्वरुपाची राहतील यासाठी चांगल्या प्रकारचे अंदाजपत्रक तयार करावे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतातील उत्पादित माल घरी किंवा बाजारपेठेत पोहचविण्यासाठी चांगल्या प्रकारचे पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करावीत असे त्यांनी सांगितले.
        जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात येईल, त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. 100 दिवस जिल्ह्यातील मजूरांना रोजगार कसा मिळेल याचे नियोजन रोहयो विभागाने करावे. ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या जबाबदाऱ्या देवून कामे करुन घेण्यात येतील. तालुक्याचे नियोजन तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी एकत्र बसून करावे, असे त्यांनी सांगितले.
       उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी यावेळी सांगितले की, कुशल कामाचे मागील वर्षीचे 16 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहे, ते त्वरित मिळाल्यास संबंधितांना देता येईल. 12 मे पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत जिल्ह्यात 845 कामे सुरु असून यावर 53 हजार 262 मजूरांची उपस्थिती होती, तर यंत्रणांची 344 कामे सुरु असून यावर 16 हजार 173 मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

      सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच रोहयोची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment