जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 14 May 2017

गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवा - पालकमंत्री राजकुमार बडोले

                             गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार



     गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना आहे. लोकसहभागातून गाळ काढणे हे योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी तलावातील जास्तीत जास्त गाळ आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी 14 मे रोजी गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोला तलाव येथे केला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
       कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, पं.स.सदस्य केवल बघेले, अल्का काटेवार, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे, शाखा अभियंता श्री.रहांगडाले, उपअभियंता श्री.चौधरी, मुंडीपार सरपंच सिंधू मोटघरे, मुरदोली सरपंच ससेंद्र भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री यावेळी म्हणाले, गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक माजी मालगुजारी तलाव हे गाळाने भरले आहेत. या योजनेमुळे जिल्ह्यातील तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यास मदत होणार आहे. हा गाळ शेतीत टाकण्यात येणार असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. गाळ काढण्यात येणार असल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. हा पाणीसाठा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील तलाव, धरणातील गाळ काढण्याचे नियोजन यंत्रणांनी करावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची गरच लक्षात घेवून ही योजना सुरु केली आहे. हा गाळ नसून खत आहे. ‍जिल्ह्यातील जास्तीत जास्त गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसहभागातून जास्तीत जास्त तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. सुपीक गाळाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढवावी. गाळ शेतात टाकणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेत प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       श्री.ठाकरे म्हणाले, या योजनेअंतर्गत शेतकरी पुढाकार घेवून तलावातील गाळ काढणार आहे. गाळ काढून शेतीत टाकल्यास शेतीची उत्पादन क्षमता तर वाढेलच पण तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील. लोकांच्या सहभागाशिवाय योजना यशस्वी होत नाही. गाळ काढण्याच्या कामात लोकांनी सहभाग देवून चांगली सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.

      सलंगटोला तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकणारे शेतकरी लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, शशी भगत, दामोदर शहारे, ठेकचंद ठाकुर यांना पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले. गराडा, मुंडीपार व सोदलागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात या तलावातील गाळ टाकण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मुंडीपार, गराडा, सोदलागोंदी येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांनी मानले.

No comments:

Post a Comment