जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 16 May 2017

स्वच्छ व सुंदर गोंदियासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा - राजकुमार बडोले

                           गोंदिया अतिक्रमण आढावा बैठक
      घाणेरड्या शहराच्या यादीत गोंदिया शहराचा समावेश आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होवून डासाचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. आता गोंदिया हे शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 15 मे रोजी गोंदिया शहरातील अतिक्रमणाबाबतचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता श्री.मडके, ठाणेदार श्री.शुक्ला व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
      गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, अतिक्रमणामुळे शहरातील मार्केटमधून फिरणे देखील कठीण झाले आहे. अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दयाव्यात. कायदयाचे पालन करुन अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करावी. जे अतिक्रमण काढायचे आहे त्याची मार्कींग करावी. डॉटेड लाईनच्या बाहेरचे अतिक्रमण काढावे. अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याबाबतची पूर्व कल्पना पोलीस विभागाला दयावी. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आवश्यक ते पोलीस बल मागवून घ्यावे व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेची निवड त्वरित करण्यात यावी. शहरात कोणतीही व्यक्ती उघड्यावर शौचास बसणार नाही याची काळजी घ्यावी. गोंदिया हे शहर शौचमुक्त झाल्यामुळे शौचालयाचा प्रत्येक जण नियमीत वापर करतील यासाठी त्यांना उघड्यावरील शौचाचे दुष्परिणाम पटवून दयावे. शहरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती करुन ती नियमीत वापरात आणावी. गोंदियात बायोटॉयलेटचा वापर करता येईल का याकडे देखील नगर पालिकेने लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले.
       गोंदिया शहरातील काही भागात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याचे लक्षात आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेवून ज्या भागात दुषीत पाणी पुरवठा होत आहे त्या भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम तातडीने करावे. काही दिवसानंतर पावसाळा सुरु होणार आहे त्यामुळे जलजन्य आजाराची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी. नगर पालिकेने नाल्यांची वेळोवेळी सफाई करुन वाडी-वाडीतील कचरा वेळीच उचल करावा. अनेक भागात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, असे ते म्हणाले.
      जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम लवकरच सुरु करण्यात येईल. ज्यांचे अतिक्रमण तोडले जाणार आहे त्या अतिक्रमण धारकाकडून खर्चाचा पैसा वसूल करावा, असे सांगितले.

     नगराध्यक्ष इंगळे म्हणाले, शहरात ज्या-ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे त्यांना ते अतिक्रमण काढण्याबाबतच्या नोटीस दिल्या आहेत. त्यांनी स्वत:हून केलेले अतिक्रमण काढावे अन्यथा अतिक्रमण मोहिमे दरम्यान ही अतिक्रमणे काढण्यात येतील. नगर पालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शहरातील दुषीत पाणी पुरवठ्याबाबत जीवन प्राधिकरण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेशी बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment