जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 26 May 2017

शेतकऱ्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री बडोले

सलंगटोला येथे शिवार संवाद सभा
      मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 11 हजार 95 कोटी रुपयांची राज्यातील शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मदत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून अपुर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीशी संबंधित असलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देवून त्यांना समृध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        सालेकसा तालुक्यातील सलंगटोला येथे आज 26 मे रोजी आयोजित शिवार संवाद सभेत उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, माजी जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता पुराम, माजी पं.स.सभापती बाबुलाल उपराडे, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री.बहेकार यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांची कर्जफेड शासनाने केली असून उर्वरित 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना पिक विम्याचे 6739 कोटी रुपये दिले आहे. 2019 पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला असून यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात येत आहे. शाश्वत सिंचनासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे. या अभियानातून 544 कोटीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. 12 लाख 51 हजार 713 हेक्टर क्षेत्रासाठी एकवेळच्या संरक्षीत सिंचनाची सुविधा यातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
      गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यासाठी वरदान असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, आपला जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ खत म्हणून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून तो शेतात टाकल्याने शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. यावर्षी 400 तलावांचा गाळ काढण्यात येत असून येत्या तीन वर्षात सर्वच 1800 तलावातील गाळ काढण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे 25 टक्के सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      रोजगार हमी योजनेच्या निकषामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले की, या बदलामुळे वैयक्तीक लाभाच्या विविध योजनांचा लाभ व पांदण रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. जिल्ह्यात युरियाचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. मागेल त्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज जोडणी देण्यात येईल. शेती प्रकृतीची तपासणी करण्यासाठी माती परीक्षण करण्यात येत आहे. धान खरेदी केंद्रावर धान सडणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून स्वस्त धान्य दुकानातून चांगल्या प्रतिच्या तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. 100 एकर शेतीमध्ये गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      आमदार पुराम म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्याय विविध योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम, घरकूल योजना, वीज कनेक्शन यासह अनेक बाबीवर शासनाने काम केल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.अंजनकर म्हणाले, केंद्र व राज्याने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. त्या योजनांचा संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. योजनेच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. विकास कामामुळे विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी तालुक्यातील 13 दुष्काळग्रस्त गावांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची बाब उपस्थित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत लवकर कार्यवाही करुन संबंधित गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गावाच्या परिसरात एका माकडाच्या उपद्रवामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त असून काही लोकांना या माकडाने चावा घेतल्यामुळे माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्यावर पालकमंत्र्यांनी उपवनसंरक्षकांना ही माहिती भ्रमणध्वनीवरुन देवून त्या उपद्रवी माकडाला ताबडतोब पकडण्याचे निर्देश दिले. मोतीराम भांडारकर या शेतकऱ्याचे 10 एकर शेतीतील धान कुणीतरी अज्ञान व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे शासनाने त्या व्यक्तीस त्वरित मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरुन दिल्या. सलंगटोला येथे आयोजित शिवार संवाद सभेला गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          

No comments:

Post a Comment