जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 2 May 2017

सामुहिक सोहळ्यात विवाह करणाऱ्यांच्या रक्कमेत 50 हजार रुपयापर्यंत वाढ करणार - पालकमंत्री राजकुमार बडोले



      सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे काम आहे. सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनामुळे समाजात सामाजिक समता निर्माण होते. अशाप्रकारच्या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्यांसाठी सध्या 10 हजार रुपये देण्यात येत आहे. त्यामध्ये वाढ करुन ती आता 20 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यापुढेही विचार करुन भविष्यात 50 हजार रुपये देण्याचा विचार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       1 मे रोजी भीमघाट स्मारक समिती गोंदियाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचे उदघाटक म्हणून श्री.बडोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील अशोक सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक शिलवंत होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, पंचायत समिती सभापती श्याम गणवीर, नगरपरिषद सदस्य भागवत मेश्राम व कुंदाताई पंचबुध्दे, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, भीमघाट स्मारक समितीने सर्वधर्मीय सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करुन आदर्श निर्माण केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमित्त या स्मारक समितीला 1 कोटी रुपये मंजूर केले आहे. हा निधी कमी पडल्यास आणखीही निधी देण्यात येईल. विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेला 10 हजार रुपये प्रती जोडपे याप्रमाणे मदत करण्याचा विचार आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी 5 लक्ष रुपये प्रोत्साहन मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     जाती तोडो आंदोलनाची सुरुवात डॉ.आंबेडकरांच्या विचारातून झाल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, जाती तोडो आंदोलनाचा महत्वाचा तोडगा आंतरजातीय विवाह करणे हा आहे. विवाह हे पवित्र बंधन आहे. एकमेकांना समजून घेवून जीवनाचा गाडा सुख दु:खात एकमेकांच्या सहकार्याने ओढला जावा अशी अपेक्षा व्यक्त करुन नवदांम्पत्यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.
      नगराध्यक्ष इंगळे यावेळी म्हणाले, सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनामुळे वधु पित्याची आर्थिक बचत होते. सामुहिक विवाह पध्दती ही आदर्श असून भविष्यात युवक-युवतींनी अशाप्रकारच्या सोहळ्यातूनच विवाहबध्द झाले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी रतन वासनिक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवदांम्पत्यांना जीवनावश्यक वस्तू भेट स्वरुपात डिनर सेट व टेबल फॅन वितरीत करण्यात आले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे यांनी केले. संचालन अनिल रामटेके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार लक्ष्मीकांत डहाट यांनी मानले. कार्यक्रमास नवदांम्पत्यांचे नातेवाईक तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment