जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday 12 September 2020

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

              नुकसानग्रस्तांना केंद्राच्या पथकाने दिला दिलासा

                               

                              

मागील महिन्यात 28 व 29 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि उदभवलेल्या पूरपरिस्थिमुळे नुकसान झालेल्या भागाची केंद्रीय पथकाने आज 12 सप्टेंबर रोजी गोंदिया तालुक्यातील जिरुटोला, बिरसोला व कासा गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी केंद्रीय पथकाने ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत पथकाला थोडक्यात माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री मीना यांनी घरांची झालेली पडझड, गोठयांचे व शेतीचे नुकसान, जनावरांची प्राणहानी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत पथकाला माहिती देऊन चर्चा केली.

         या केंद्रीय पाहणी पथकात संचालक, कृषि नागपूर आर.पी.सिंग, केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे उपसचिव एस.एस.मोदी व महेंद्र सहारे यांचा समावेश होता. पथकाने गोंदिया जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी केली असून आपला अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार श्री खडतकर, जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, गटविकास अधिकारी  श्री ईनामदार, पूर नियंत्रण अधिकारी रमेश मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जि.प.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री पटले, जि.प.कृषि विकास अधिकारी महेंद्र मडामे, जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ललित मुंदडा व पोलीस विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          संबंधित गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पथकातील सदस्यांना दिली व जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा व्यक्त केली.घरांचे, शेतीचे, गोठ्यांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. त्यावर पथकाने पूर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र शासनाकडे सादर करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणेबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

         ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी यांनी सर्व्हेक्षण करुन जीवनावश्यक पुरवठा केला. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. आरोग्य विभागाने औषध पुरवठा, कृषि विभागाने प्राथमिक अंदाज तयार करुन प्रस्ताव सादर केला व जनावरांची आरोग्य तपासणी करण्यासाठी चमू पाठविण्यात आल्याची  माहिती यावेळी देण्यात आली.

        केंद्रीय पथकाने गोंदिया तालुक्यातील जिरुटोला येथे जावून पुरामुळे धानाचे नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना काही मदत मिळाली काय याबाबत ग्रामस्थांशी संवाद साधून विचारपूस केली. बिरसोला येथे पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसानीबाबत आपल्याला मदत मिळणार आहे असा दिलासा दिला. गावातील आंगणवाडी सुरु आहे की नाही याबाबत पथकाने विचारपूस केली असता गावातील आंगणवाडी सेविकाने सांगितले की, गावात एकूण 5 आंगणवाडी असून पुरात आंगणवाडीच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची माहिती दिली.याचा पंचनामा करण्यात आला का याबाबत पथकाने विचारणा केली.

       पथकाने यावेळी बिरसोला येथील हर्षाबाई पाचे यांचे घर पुराने पडल्यामुळे घराची पाहणी केली तर कासा गावातील शेतकरी विजय तिवारी यांच्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्याशी चर्चा केली व कुमोद तिवारी यांचे घर पुरामुळे पडल्याने प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीत पथकाच्या सदस्यांनी नुकसानग्रस्त शेती,घरेव गोठ्याची प्रत्यक्ष पाहणी करुन ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुरामुळे नुकसानीचा सविस्तर अहवाल लवकरच केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment