जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 29 September 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी जबाबदारीने काळजीपूर्वक कामे करावी - दीपक कुमार मीना


       जिल्ह्यात सातत्त्याने कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरीता संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काळजीपूर्वक कामे करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

        आज 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड-19 संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. रॅपिड ॲन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देण्यात यावा. बाधित रुग्णांची टेस्ट 24 तासात येईल असे नियोजन करावे. होम क्वारंटाईन रुग्णांना स्टॅम्प लावण्यात यावे. कोरोना केअर सेंटरमधील सर्व कामे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सोपविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रायव्हेट लॅबकडे सुध्दा लक्ष देण्यात यावे. बाधित रुग्णांबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

           जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना सांगितले की, RTPCR Test ची डाटा ऐन्ट्री प्रलंबीत आहे, त्यामुळे टेस्टींगचे काम व्यवस्थीतरित्या झाले पाहिजे. कोणत्याही बाधित रुग्णांची ॲन्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडावी. रुग्णांच्या रक्ताची चाचणी करुन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात यावा. आरोग्य तपासणीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असेल तर आजूबाजुच्या नागरिकांना नगरपरिषदेतर्फे कळविण्यात यावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल असेही श्री मीना यावेळी म्हणाले.

       गोंदिया येथे जिल्हा क्रीडा संकुल, पॉलिटेक्नीक कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होणार नाही व कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही याकडे लक्ष दयावे. रुग्णाला डिस्चार्ज करतांना होम आयसोलेशनचा त्याच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा. कोरोना बाधित रुग्णांना घाबरवू नका, त्यांना दिलासा दिला पाहिजे. 24 तासात रुग्णाची टेस्टींग रिपोर्ट यायलाच पाहिजे. कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाला पूर्वपरवानगीशिवाय बाहेर काढता येणार नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बाधित व्यक्तीच्या बॉडीचे प्रोटोकॉल पाळण्यात यावे. कोरोना बाधित रुग्णांबाबत यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. कोरोनाबाबत मनुष्यबळाची अडचण असल्यास गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन आतापर्यंत 408 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी माझे कुटूंब-माझी जबाबदारीमोहिमेअंतर्गत यंत्रणांनी कुटूंबाचे सर्व्हे करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय आढावा घेतला. कुटूंबाचे सर्व्हे करण्याकरीता आशा सेविकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. कुटूंबाचे सर्व्हे ऑफलाईन व ऑनलाईन करण्यात यावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून व्यवस्थीतरित्या काम करावे. नगरपरिषद मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी कोरोना बाधित रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे असेही श्री.मीना यावेळी म्हणाले.

       सभेला उपजिल्हाधिकारी राहूल खांदेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपतेतहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री पांचाल, पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment