जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 15 September 2020

कोरोनावर समन्वयातून मात करतांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे - आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे

                   सडक/अर्जुनी येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ 


जिल्ह्यात कोरोना संसर्गावर प्रभावीपणे मात करतांना शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे व कोविड रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.असे आवाहन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले.

        आज 15 सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालय सडक/अर्जुनी येथे माझे कुटूंब माझी जबाबदारीया मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून आमदार चंद्रिकापुरे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना हे होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,तहसीलदार उषा चौधरी,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

        माझे कुटूंब - माझी जबाबदारीही मोहिम कशी राबवावी याबाबत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलतांना ते म्हणाले, 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर असा आहे.

         जिल्ह्यातील प्रत्येक गावातील घराघरात गृह भेटीसाठी आरोग्य पथक निर्माण करण्यात आले असून ते पथक आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे शरीराचे तापमान व रक्तातील ऑक्सीजन प्रमाणसाठी SPO2 तपासणी करतील. कोरोना आजारात कुठलेही लक्षणे न दिसता SPO2 पातळी कमी झाल्याचे आढळून आले आहे. तसेच सध्याच्या कोरोना विषाणू संबंधाने तीव्र श्वसनाचे आजार, फ्ल्यू सदृश्य आजार व जोखिमेचे आजार जसे- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग विकार, किडनी विकार, कर्करोग व इतर गंभीर आजार यांचे सर्व्हेक्षण करुन माहिती संकलीत करुन त्यांची कोविड-19 बाबत तपासणी करणे, आवश्यक असल्यास संदर्भ सेवा व आरोग्य शिक्षण देणार आहेत. तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, आपण आपल्या घरी येणाऱ्या पथकास सहकार्य करुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. जेणेकरुन कोरोना बाधितांची संख्या व त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

        या कार्यक्रमाला अर्जुनी/मोरगाव,सडक/अर्जुनी आणि देवरी तालुक्यातील संबधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 00000

 

No comments:

Post a Comment