जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 27 September 2020

‘माझा जिल्हा-माझी जबाबदारी’ मोहिम राबविणार - जिल्हाधिकारी मीना




             ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारीही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात माझा जिल्हा-माझी जबाबदारीमोहिम राबविणार असे मत जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांनी व्यक्त केले.

        जिल्हाधिकारी मीना पुढे म्हणाले, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून कोविड-19 विषाणू बाधित रुग्णांना त्यांच्या स्वगृही विलगीकरण/अलगीकरण करुन शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

        गोंदिया नगर परिषद क्षेत्रातील एखादी व्यक्ती जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह येते तेव्हा तिला नगरपरिषदेच्या कंट्रोल रूममधून फोन करून कोवीड केअर सेंटरमध्ये जाण्याविषयी सुचविले जाते. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण व्यक्ती गेल्यास तेथे त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. तसेच आवश्यकतेप्रमाणे औषधे दिली जातात. तसेच रुग्णाची आरोग्यविषयक स्थिती विचारात घेऊन रुग्णाला गृह अलगीकरणात ठेवावे किंवा कसे याबाबतचा निर्णय घेतला जातो. अशा कोवीड पॉझिटिव्ह व्यक्तीने कोवीड केअर सेंटरमध्ये‌ नोंदणी करून स्वतःची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते.   

        गोंदिया तालुक्याअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन न करता अनेक नागरिक खाजगी/शासकीय रुग्णालयात जावून Antigen/RTPCR तपासणी करतात व सदर तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी नजिकच्या कोरोना केअर सेंटर केंद्रावर जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे.

       तथापि कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नजिकच्या कोरोना केअर सेंटर, आरोग्य विभाग तसेच प्रशासनाला कोणतीही माहिती न देता स्वमर्जीने घरीच राहतात आणि खुलेपणाने समाजामध्ये वावरतात. यामुळे रुग्णांच्या स्वतःच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यांनी असे केल्यामुळे गोंदिया शहरांमध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह केसेस येण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे.अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरुध्द दंडात्मक कार्यवाही करुन 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या कामासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन पथक गठीत करण्यात आलेले आहेत असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

       ज्या नागरिकांना आजाराची काही लक्षणे आहेत त्यांनी नजिकच्या आरोग्य केंद्राला भेट दयावी. तसेच पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी प्रशासकीय आरोग्य संस्थांना भेट देवून संपर्क करावा. असे पॉझिटिव्ह रुग्ण जे कोरोना बाधित झाले असता प्रशासनाला कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने घरीच गृह अलगीकरण (Home Isolation) करतात आणि समाजामध्ये खुलेपणाने वावरतात अशा रुग्णांवर दंडात्मक कार्यवाही करुन 10 हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास किंवा ते कोरोना बाधित असल्यास त्यांनी तात्काळ प्रशासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा आणि जवळच्या कोवीड केअर सेंटरमध्ये जाऊन स्वतःची प्राथमिक आरोग्य तपासणी करून घ्यावी. कोणीही स्वमर्जीने घरी गृह अलगीकरणात राहू नये व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मुक्तपणाने फिरू नये. त्याची माहिती प्रशासकीय आरोग्य संस्थांना दयावी.

      आज जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राहूल खांदेभराड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे उपस्थितीत नियुक्त 15 पथकाद्वारे पोलीस विभाग, नगर परिषद कर्मचारी यांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबवून गोंदिया नगर परिषद हद्दीतील नियमभंग करुन स्वमर्जीने घरीच राहणाऱ्या एकूण 70 रुग्णांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाचे आदेश संबंधित रुग्णांचे घरी जावून देण्यात आलेले आहे. संबंधितांनी अलगीकरणाचा कालावधी संपुष्टात येताच मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांचेकडे हजर राहून सदर दंडाच्या रक्कमेचा भरणा करावा असे आदेशित करण्यात आलेले आहे.

00000

      


 

No comments:

Post a Comment