जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 19 August 2019

ग्रामस्थांच्या अस्तित्वाचे दस्ताऐवज लवकरच देणार - पालकमंत्री डॉ. परिणय फुके

धमदीटोला येथे जनजागृती व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम


        नक्षलवादयांनी मिसीपीरी ग्रामपंचायतीला आग लावल्यामुळे ग्रामस्थांचे जन्म व मृत्यू अभिलेखे जळून नष्ट झाली. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही योजनांचा लाभ घेतांना तसेच शासकीय कामासाठी लागणारी ग्रामपंचायतीची हीच दस्ताऐवज नष्ट झाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ग्रामस्थांचे हे दस्ताऐवज तयार करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. ग्रामस्थांच्या अस्तित्वाचे दस्ताऐवज लवकरच उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
            19 ऑगस्ट रोजी धमदीटोला येथे जन्म मृत्यू अभिलेखांचे पुर्नबांधणी करुन जन्म मृत्यू दस्ताऐवज पुर्नस्थापित करण्याबाबत जनजागृती व  प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. फुके बोलत होते. अध्यक्षस्थानी  आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा परिषद सदस्य माधूरी कुंभरे, उषा शहारे, भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, पंचायत समिती सदस्य महेंद्र मेश्राम, प्रमोद संगडीवार, महेश जैन, झामसिंग येरणे, शिवप्रसाद हिरवानी, गिरीधारी मडकाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
            डॉ. फुके म्हणाले, मिसीपीरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना त्यांचे जाळलेले हे दस्ताऐवज लवकर मिळावे यासाठी आपण व आमदार पुराम यांनी पुढाकार घेतला. याबाबतचा शासन निर्णय 2 ऑगस्टला काढण्यात आला. या दुर्गम, आदिवासी व नक्षलदृष्टया संवेदनशील असलेल्या या भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. ककोडी येथे सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यन्वित झाले आहे. त्यानंतर चिचगड येथे अप्पर तहसिलदार कार्यालय देखील सुरु होणार आहे. या भागातील बेरोजगार युवकांना देवरी येथील एमआयडीसीमधील उद्योगातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
            आमदार पुराम म्हणाले, मिसपीरी या गावासाठी हा आज एक ऐतिहासिक दिवस आहे.  या गावाला भेट देणारे डॉ. फुके हे पहिले पालकमंत्री आहेत. जन्म मृत्यू दस्ताऐवज या ग्रामंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना मिळाले पाहिजे. यासाठी आपण ग्रामस्थांना 15 दिवसाचे आश्वासन दिले होते. शासनाने याबाबतचा शासन निर्णया काढून या कामाला मूर्त रुप दिले आहे. हे काम इतक्या लवकर करणे सोपे नव्हते. आठ वर्ष या ग्रामस्थांनी ही समस्या सहन केली. या भागातील आदिवासी बांधवाना तेंदूपत्ता बोनस देण्यात येईल तसेच वनहक्क पट्टे देखील देवून त्यांच्या इतरही समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
            श्रीमती मडावी म्हणाल्या, नक्षलवाद्यांनी ग्रामपंचायत जाळल्यामुळे गावातील नागरिकांचे ग्रामपंचायतीशी संबंधित दस्ताऐवज जळाले ते नव्याने तयार करुन देण्याचे काम सुरु झाले असून आज त्यापैकी काही प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
            यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मिसीपीरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुजूरबडगा येथील मनोहर वादले, येडमागोंदी येथील चंद्रपाल सलामे, कलकसा येथील लखनलाल कुंभरे, धमदीटोला येथील मानिकलाल कुंभरे, मांगाटोला येथील संतोष नरेटी, मिसपीरी येथील पांडू मडावी चतुरलाल मडावी, कृष्णा शेवता, सुरेंद्र बन्सोड यांना जन्म प्रमाणपत्र तर सिंधूबाई कुंभरे, लताबाई सयाम, प्रमिलाबाई पंधरे या महिलांना कन्यारत्न जन्मानंद भेट योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयाचे धनादेश वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गोंविद पराते यांनी केले. प्रास्ताविक उपसंरपच जीवनलाल सलामे यांनी केले.
                                                        

No comments:

Post a Comment