दिव्यांग
विद्यार्थ्यांच्या
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा
दिव्यांग
विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याच प्रकारच्या कल्पकता नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांनी
त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा हया त्यांच्या सुप्त गुणांना
चालना देणाऱ्या आहेत. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग
दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उदघाटन
कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून
श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य सीमा मडावी, उपविभागीय
पोलीस अधिकारी रमेश बरकते, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, दिव्यांग
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी अशाप्रकारचे शिक्षण दयावे की त्यांच्या मनातील
आपण दिव्यांग असल्याचा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. त्यांच्या पालकांना सुध्दा
वाटले पाहिजे की माझी मुले दिव्यांग असून सुध्दा शाळांमधून चांगले शिक्षण घेत आहे,
असे त्या म्हणाल्या.
श्रीमती मडावी म्हणाल्या, दिव्यांग
मुले-मुली शारिरीकदृष्ट्या दिव्यांग असले तरी त्यांनी मनाने आपण दिव्यांग नाही ही
भावना ठेवावी. सर्वसामान्य लोकांसारखेच आम्ही देखील आहोत अशाप्रकारची भावना
दिव्यांग बांधवांमध्ये असली पाहिजे. मन सुदृढ असले आणि विचार चांगले असतील तर कोणत्याही
दिव्यंगत्वावर मात करता येते असे त्यांनी सांगून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी
शुभेच्छा दिल्या.
श्री.बरकते म्हणाले, कुठलेही दिव्यंगत्व हे
शरीरात असणे हे यश संपादन करण्यासाठी अडसर ठरु शकत नाही. युपीएससीच्या परीक्षेत
उल्हासनगर येथील श्रीमती प्रांजल पाटील हया दोन्ही डोळ्यांनी आंधळ्या असून देखील
त्या आयएएस बनल्या. त्या आपल्यासाठी आदर्श आहेत. त्या मुंबईत शिक्षण घेत असतांना
लोकल ट्रेनने एकट्या महाविद्यालयात जायच्या. त्यांनी अपंगत्वावर मात करुन यश
संपादन केले. शारिरीक आणि मानसिक अपंगत्व ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यांनी
आपल्या बुध्दीने त्यावर मात करावी असेही ते म्हणाले.
क्रीडा स्पर्धेत मंगलम मुकबधीर शाळा
गोंदिया, डी.पी.पटेल मतिमंद मुलांची शाळा गोंदिया, मानवता मतिमंद मुलांची शाळा
आमगाव, दंडकारण्य निवासी अपंग विद्यालय सडक/अर्जुनी व देवरी, श्रीराम मतिमंद
निवासी शाळा गोंदिया, ज्ञानदिप मतिमंद मुलांची शाळा गोरेगाव, स्व.जमुनाबाई निवासी
मतिमंद विद्यालय उमर्रा येथील 250 विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.
यामध्ये धावणे 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब
उडी, स्पॉट जम्प, बादलीत बॉल टाकणे, भराभर चालणे आदी क्रीडा स्पर्धेत
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व
विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार
जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.
No comments:
Post a Comment