जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 21 February 2017

योजनांच्या लाभातून सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न - राजकुमार बडोले



अर्जुनी/मोरगाव येथे महावितरण महासमाधान शिबीर
27840 लाभार्थ्यांना दिला योजनांचा लाभ
      गोंदिया,दि.21 : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ आजपर्यंत घेता आला नाही. महासमाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या दारापर्यंत पोहचून योजनांचा लाभ देवून सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       आज 21 फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगाव तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात महाराजस्व अभियानाअंतर्गत महावितरण महासमाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव कापगते, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुमरे, श्री.पालीवाल, तेजुकला गहाणे, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या तालुक्यातील माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पुढील तीन वर्षात तलावांची दुरुस्ती व खोलीकरण करण्यात येईल. रस्ते, सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या भागातील नागरीकांना व्हावी याचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आता धानाव्यतिरिक्त इतर नगदी पिकाकडे वळावे. उसाची जास्तीत जास्त लागवड करुन त्यावर प्रक्रियेसाठी साखर कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, लवकरच या योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळेल. जुनेवानी प्रकल्पाला मंजूरी मिळाली असून तो प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागेल. या भागातील वीज भारनियमन कमी करुन शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. स्वच्छ महाराष्ट्रमध्ये गोंदिया सुध्दा प्रथम क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, विविध क्षेत्रात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले घर खरेदी केले आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ.आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहणार आहे. ओबीसी बांधवांसाठी क्रिमीलेअरची मर्यादा 6 लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
       जिल्हाधिकारी काळे म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज जग बदलत चालले आहे. आधारकार्ड हे सर्वव्यापी होणार आहे. आधारबेस इंटरनेट सेवेचा उपयोग करुन भविष्यात लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. भिम ॲपद्वारे शिबिराचे अर्ज ऑनलाईन करण्यात येणार आहे. कोणते प्रमाणपत्र पाहिजे हे त्यावर नमूद करावे लागणार आहे. भविष्यात जनतेच्या समस्या सोडवण्याचे मोबाईल हे महत्वाचे साधन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     माजी आमदार कापगते म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनहक्क पट्टे वाटपांचा कालबध्द कार्यक्रम वन विभागाने आखावा. उन्हाळा, पावासाळा व हिवाळा या तिनही ऋतुमध्ये या भागातील शेतकरी बारमाही पीक कसे घेतील याचे नियोजन कृषि विभागाने करावे. तलावातून सिंचनाची सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे. भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची सुटका करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली                                                                            डॉ.पुलकुंडवार म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अभियानामुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी जनजागृती झाली आहे. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी हे अभियान यशस्वी ठरले आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना सन 2022 पर्यंत घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनांचा लाभ गरजु व्यक्तीला मिळाला पाहिजे. जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य चांगले असणे महत्वाचे आहे. जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करुन ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ पात्र व गरजु लाभार्थ्यांना पारदर्शकपणे पोहोचविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      डॉ.भुजबळ म्हणाले, कल्याणकारी राज्य आणि विकासात्मक प्रशासन याचा प्रत्यय या अभियानातून दिसून येत आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून चांगले सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आणि नोकरी विषयक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
      डॉ.रामगावर म्हणाले, वनांचा विकास लोकांच्या सहभागातून करण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. ग्राम वनाची संकल्पना देशात केवळ महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. वनाचे अधिकार ग्रामस्थांना देण्यात येत आहे. ग्राम वनांचा विकास करण्यात येणार आहे. गॅस कनेक्शनचा ग्रामस्थांना पुरवठा करुन त्यांचे वनावरील अवलंबीत्व कमी करण्यात येत असल्याचे सांगितले.
      श्रीमती गहाणे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना यापूर्वी खुप त्रास होत होता. पालकमंत्र्यांनी या महासमाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांनाच थेट लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भविष्यात तलावांचे खोलीकरण व दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महासमाधान शिबिरातून 27840 लाभार्थ्यांना मिळाला लाभ
    आजच्या महावितरण महासमाधान शिबिराचे औचित्य साधून तालुक्यातील 27840 लाभार्थ्यांना 44 योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना कागदपत्रे व वस्तू स्वरुपात लाभ देण्यात आला. यामध्ये नविन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव चढविणे/कमी करणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, जमिनीचे वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतर, संपत्तीचे आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, विद्यर्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, जमिनीचे मोजणी पत्र, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, कृषि पंपांना नविन वीज जोडणे, व्यावसायीक कनेक्शन, घरगुती नविन वीज जोडणे, रमाई घरकूल योजना, इंदिरा आवास योजना, मुद्रा बँक कर्ज, पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, आंतरजातीय विवाहन प्रोत्साहन योजना, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसान भरपाई, महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी कर्ज वाटप, वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप, मुलामुलींना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप, अपंगगत्व ओळखपत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, डिझेल पंप वाटप, उज्वला गॅस योजना, शेड नेट पॉलीहाऊस, बैलजोडी, पाईप, औजारे, धान उफणनी, पंखा, बैलगाडी, जनधन योजना, अपंगत्व प्रमाणपत्र, अपंग व्यक्तींना सहायक साधने व उपकरणे आणि गटई कामगारांना स्टॉलचे वाटप तसेच दिव्यांग स्वावलंबन योजनेअंतर्गत तपासणीअंती निवड झालेल्या 106 व्यक्तींना उपकरणे व साधनांचे वाटप करण्यात आले.

     प्रारंभी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेट दिली. महावितरण समाधान शिबिरात विविध विभागाचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी या स्टॉलला भेट देवून योजनांविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी तिबेटियन निर्वासीत वसाहतीतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी, नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी आणि आश्रमशाळेच्या विर्थ्यार्थीनींनी नृत्य सादर केले. महासमाधान शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेण्याऱ्या अधिकारी, कर्मचारी, सरपंच, तलाठी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील हजारोच्या संख्येने लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार डी.सी.बोंबर्डे यांनी केले. संचालन प्रा.डी.यु.काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment