जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday 26 February 2017

शिक्षण,आरोग्य व रोजगार निर्मितीला प्राधान्य - राजकुमार बडोले



बेरडीपार प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन
      अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आता पूर्ण झाली आहे. मागील अनेक वर्षापासून जी कामे झाली नाही ती कामे आता होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनांची अंमलबजावणी करतांना आपले शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मितीला प्राधान्य राहील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      25 फेब्रुवारी रोजी तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जि.प.माजी उपाध्यक्ष मदन पटले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, जि.प.सदस्य रजनी कुमरे, पं.स.सदस्य डॉ.ब्रिजलाल रहांगडाले, पवन पटले, रगनीक सयाम, तुमेश्वरी बघेले, भाऊदास कठाणे, सलाम शेख, बेरडीपारच्या सरपंच ज्योत्सना टेंभेकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत भगत, सेजगावच्या सरपंच मिनेश्वरी पारधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     पालकमंत्री बडोले म्हणाले, तिरोडा तालुक्यातील भानपूर व बेरडीपार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नविन पध्दतीची इमारत इथे लवकरच उभी राहणार आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या भागातील रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता रस्ते विकासाची कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येतील. तालुक्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी समाधान शिबीर घेण्यात यावी अशी उपयुक्त सूचना त्यांनी यावेळी केली.
     माजी आमदार पटले म्हणाले, लोकांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरचे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहणार आहे. शासन अनेक योजना लाभार्थ्यांसाठी राबवित आहे. त्या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात विकासाला गती मिळाली आहे. धापेवाडा उपसा सिंचनचे पाणी खडबंदा तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
     आमदार रहांगडाले म्हणाले, आरोग्याच्या सुविधा या भागातील नागरिकांना मिळाव्या यासाठी बेरडीपार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. इमारत आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषधी नाही अशी स्थिती भविष्यात राहणार नाही याची ग्वाही देवून श्री.रहांगडाले पुढे म्हणाले, 5 कोटी 50 लाख रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात येणार आहे. प्रत्येक लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे. जनतेने जी पाच वर्षासाठी जबाबदारी दिली आहे ती निश्तिच पूर्ण करण्यात येईल. जिल्हा परिषदेने या क्षेत्राच्या रस्ते विकासासाठी निधी दयावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरपंच श्रीमती टेंभरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

     कार्यक्रमाला बेरडीपार व परिसरातील गावातील नागरिकांची, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर.टेंभूर्णे यांनी मानले.

No comments:

Post a Comment