जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 28 February 2017

मराठी भाषेचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी - युवराज गंगाराम

                                                          मराठी भाषा गौरव दिन साजरा
                         




      मराठी भाषेचे वैभव आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तिची जोपासना व संवर्धन करणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे मत कवि व ज्येष्ठ साहित्यिक युवराज गंगाराम यांनी व्यक्त केले.
      28 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात जिल्हा ग्रंथालय कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. यावेळी एस.एस.गर्ल्स कॉलेजच्या प्रा.डॉ.कविता राजाभोज, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.सविता बेदरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
     श्री.गंगाराम पुढे म्हणाले, आपली मातृभाषा मराठी आहे. मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले, आज आपल्याला मराठी भाषेचे चिंतन व विचार करण्याची गरज आहे. मराठी भाषेचे भवितव्य सुरक्षीत आणि समृध्द करण्यासाठी मराठीच्या विविध बोलींची जोपासना केली पाहिजे. कोणत्याही साहित्याला वाङमयीन मुल्य असते. त्यामुळे मराठी भाषेची सर्जनशीलता वाढविली पाहिजे. माणसाला कोणत्याच प्रकारची गरीबी नको, तर भाषेची सुध्दा गरीबी नको. माणसांनी माणसासोबत संवाद करायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रास्ताविकातून श्री.बोपचे यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या वतीने 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही आपण सर्वांची मायबोली आहे. आपल्या मराठी भाषेला चांगले दिवस यावेत तसेच सामान्य जनतेपर्यंत मराठी भाषा पोहोचावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कविवर्य कुसुमाग्रजांचे नटसम्राट साहित्य फार प्रचलीत आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.खडसे म्हणाले, कोणत्याही कार्यक्रमाला जावून त्यांचे प्रबोधन ऐकूण आपली विचारशक्ती प्रगल्भ होत असते. भविष्यात आपली विचारशक्ती आपले भविष्य घडविते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व खुप परिश्रम करुन अभ्यास करावा व प्रशासकीय नोकरी मिळवावी. एकीकडे मराठी भाषेची होत असलेली अधोगती पाहता मराठी भाषेचे संवर्धन, संरक्षण व प्रचार-प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या मातृभाषेचे आपण संवर्धन व संरक्षण केले पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले, मराठी भाषा चांगली प्रगल्भ व्हावी यासाठी राज्य शासनाच्या विभागात मराठी भाषा विभाग कार्यरत आहे. नक्कीच एक दिवस आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा व चांगली विचारसरणी निर्माण व्हावी यासाठी साहित्यिकांनी लिहिलेले विचार आत्मसात करुन आपली विचारसरणी प्रगल्भ करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रा.बेदरकर म्हणाल्या, संतांनी मराठी भाषेच्या वृध्दीसाठी फार मोठा हातभार लावला. ‘लाभले अम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी’ असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येकाने आपल्या घरी तरी मराठी बोलावे. जेवढी मराठी भाषा बोलू तेवढी भाषा समृध्द होईल. मूळ मराठी भाषा लोप पावत चालली आहे. मराठी भाषेची कुठेतरी गडचेपी होत आहे असे दिसून येत आहे, त्यासाठी भाषेचे महत्व लक्षात घेवून भाषा वाचवनं अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये मातृभाषेचे गुण असावे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आशावादी जाणवते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      प्रा.डॉ.राजाभोज म्हणाल्या, मराठी ही आमची मातृभाषा आहे. आपली मातृभाषा अत्यंत रसाळ आहे. इंग्रजी ही भाषा सुध्दा आपल्याला समजली पाहिजे. मराठी भाषेची प्रत्येकाने जोपासना केली पाहिजे. मातीचीच भाषा मातीचीच भूमी, तिचे स्थान इंग्रजीपेक्षा का कमी. आन मराठी, मान मराठी, सकल जणांची शान मराठी. कविवर्य कुसुमाग्रजांचे विशाखा काव्यसंग्रह साहित्य त्यांचे भूषण मानले जाते. भाषा मागे पडली तर संस्कृती मागे पडते आणि सृष्टीचा संबंध भाषेशी आहे. आपण आपल्या मातृभाषेचा बोलण्यात वापर केला तर खरोखरच आपण मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवायला मागे पडणार नाही. इंग्रजी भाषेचे पाय न तोडता आपण आपल्या मराठी भाषेला टिकवून ठेवले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी जिल्हा ग्रंथालय कार्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मयुर हुमणे व भूपेश शहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शेषराव भिरडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पंकज घारपिंडे यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.


1 comment:

  1. कविवर्य कुसुमाग्रजाणा सलाम.

    ReplyDelete