जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 22 February 2017

शेतकऱ्यांनो ! नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नगदी पिकाची कास धरा - पालकमंत्री बडोले

                                                  दवनीवाडात कृषि व पशुपक्षी प्रदर्शन
                       





   शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय चांगल्याप्रकारे करावा. आता केवळ धानावर अवलंबून न राहता शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नगदी पिकाची कास धरावी. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

      दवनीवाडा येथे 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषि व पशुपक्षी प्रदर्शन तसेच शेतकरी व पशुपालक मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, पं.स.उपसभापती श्री.भक्तवर्ती, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, वनिता पटले, श्रीमती ठाकरे, दवनीवाडा सरपंच तिजाबाई मस्करे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अनिल गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक, गटविकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, डॉ.पी.आर.सय्यद, निलकंठ लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
     श्री.बडोले पुढे म्हणाले, प्रदर्शन व मेळाव्याचा शेतकरी व पशुपालकांना फायदा झाला पाहिजे. पशुपालकांनी जास्त दूध देणाऱ्या गाई-म्हशींचे संगोपन करुन त्यांना चांगला पशुआहार दयावा. कुक्कुट पालनाकडेही लक्ष दयावे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतांना सेंद्रीय शेती करावी. त्यामुळे उत्पादीत मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे रब्बी हंगामासाठी पिकांचे नियोजन करावे.
      या क्षेत्रातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, दवनीवाडाला तालुक्याचा दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी जूनी आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे. तेव्हाच शेतीची प्रगती झालेली दिसेल असे ते म्हणाले.
      आमदार रहांगडाले म्हणाले, शेतीपुरक जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन व कुक्कुटपालन हा चांगल्याप्रकारे करता येवू शकतो. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची पोत बिघडली आहे. पण आज शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे. शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले पाहिजे यासाठी कृषी विभागाने शेतीतील मातीचे परीक्षण करावे. कृषि विभागाने योग्य मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना शेती करण्याची दिशा मिळेल. विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       यावेळी छाया दसरे, डॉ.पुलकुंडवार, डॉ.वासनिक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित कृषि व प्रदर्शनी, विविध संकरीत गाई, म्हशी, कोंबड्या, शेळी, पशुखादय, विविध प्रकारचे सेंद्रीय खते प्रदर्शनीत लावण्यात आली होती. तसेच विविध शेतकऱ्यांचे भाजीपाला, फळे यांचे स्टॉल, बियाणे, खते कंपन्यांचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले होते. या मेळाव्याला दवनीवाडा परिसरातील अनेक गावातील शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वासनिक यांनी केले. संचालन डॉ.महेश राठोड यांनी केले. उपस्थितांचे आभार वंदना शिंदे यांनी मानले.




No comments:

Post a Comment