जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday 21 October 2019

जिल्हयात शांततेत अंदाजे 70 टक्के मतदान

                         47 उमेदवारांचे भाग्य मतदानयंत्रात बंद





विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. जिल्हयात शांततेत अंदाजे 70 टक्के मतदान झाले. जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघातील 47 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्हयातील आमगांव आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हे नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होती.  दोन्ही तालुके हे आदिवासी बहूल असून ग्रामीण व दुर्गम भागातील मतदारांनी सकाळी 7 वाजतापासूनच उत्साहात मतदान केले. गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदान झाले. या मतदारंसघातील काही मतदान केंद्रावर  सायंकाळी  6 वाजतानंतरदेखील मतदार रांगेत उभे होते.
जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत 68.77 टक्के, आमगांव मतदारसंघात 57.47 टक्के तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात सांयकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत 63.53 टक्के आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात 61.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी उपलब्ध व्हायची असल्यामुळे जिल्हयात सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 10 लक्ष 98 हजार 270 इतके मतदार आहे. यामध्ये 5 लाख 45 हजार 404 पुरुष आणि 5 लाख 52 हजार 862 स्त्री मतदार तर 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात 5 हजार 13 पुरुष आणि 123 महिला असे एकूण 5 हजार 136 अधिकारी- कर्मचारी मतदान पथकात होते. 552 अधिकारी-कर्मचारी राखीव पथकात ठेवण्यात आले होते. जिल्हयातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पाँईटची व्यवस्था करण्यात आली होती. युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पाँईटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्हयातील गोंदिया येथे दोन, अर्जुनी/मोरगाव येथे दोन, तिरोडा येथे दोन आणि आमगांव या मतदारसंघात एक महिला मतदान केंद्रांचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होते. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष ते पोलीस कर्मचारी देखील महिलाच होत्या.  जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव मतदारसंघातील बोंडगावदेवी, तिरोडा मतदारसंघातील खैरबोडी आणि गोंदिया मतदारसंघातील गोंदिया येथील 205 क्रमांकाच्या मतदानकेंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली होती. तर जिल्हयातील चारही मतदारसंघात पाच आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दुपारी 12 वाजता फुलचूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावला. जिल्हयातील दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यांनी देखील उत्साहाने मतदान केले. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्हयात शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
                                                       0000000000000

No comments:

Post a Comment