जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 18 April 2017

चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न - पालकमंत्री बडोले

                         परसोडी उपकेंद्राचे लोकार्पण

      अर्जुनी/मोरगाव सारख्या मागास, दुर्गम भागाच्या विकासाला गती मिळाली आहे.  ग्रामीण भागातील लहान गावात सुध्दा ग्रामस्थांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे. परसोडी सारख्या लहान गावात उपकेंद्राचे लोकार्पण करुन चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
       अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील परसोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बडोले यांनी 17 एप्रिल रोजी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी/मोरगाव पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, परसोडी सरपंच अनिल कुंभरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत, श्री.ठवरे यांची उपस्थिती होती.
      पालकमंत्री बोलतांना यावेळी म्हणाले, या उपकेंद्राच्या लोकार्पणामुळे पांढरवाणी/रयत आणि परसोडीच्या 1500 नागरीकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. तालुक्यातील इतर उपकेंद्राचे भूमीपूजन व बांधकाम लवकरच करण्यात येतील. या उपकेंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी चांगली आरोग्य सेवा ग्रामस्थांना उपलब्ध करुन देतील असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजनेत परसोडी या गावाची निवड करण्यात आली असून आलेल्या त्रुटी दूर करुन लवकरच या योजनेचे काम सुरु होईल. रस्ते, तलाव व बंधाऱ्याचे इथले कामेही लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.
     श्रीमती गहाणे म्हणाल्या, जिल्ह्यातील विविध समस्यांना न्याय देण्याचे काम पालकमंत्री करीत आहे. ग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. या उपकेंद्रातून डॉक्टर व कर्मचारी तसेच आवश्यक तेवढ्या औषधांचा नियमीत पुरवठा करण्यात येईल. या भागातील नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
     श्री.शिवणकर म्हणाले, आरोग्याच्या सुविधा वृध्दींगत व्हाव्यात यादृष्टीने आरोग्य विभाग काम करीत आहे. जास्तीत जास्त निधी आरोग्य सेवेसाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

     परसोडी उपकेंद्राची इमारत 37 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आली आहे. पांढरवाणी/रयत व परसोडी या दोन गावातील 1500 नागरिकांना या उपकेंद्राच्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल हजारे, अभियंता सुनिल तरोणे व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले. संचालन डॉ.अजय अंबादे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ.विजय राऊत यांनी मानले.

No comments:

Post a Comment