जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 21 April 2017

ऊर्जा विकासाची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री बडोले

         पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत करण्यात येणारी उपकेंद्राची कामे, उपकेंद्रांची क्षमता वाढ, नविन रोहीत्र, नविन वाहिन्या व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वीज जोडणीच्या कामासह अन्य ऊर्जा विकासाची कामे वीज वितरण कंपनीने वेळेत पूर्ण करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 20 एप्रिल रोजी पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचा आढावा घेतांना श्री.बडोले बोलत होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, विद्युत वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, मागील सन 2016-17 या वर्षात वीज वितरण कंपनीने जिल्ह्याच्या ऊर्जा विकासाबाबत जिल्हा नियोजन समितीकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 3 कोटी रुपये मंजूर झाले होते. यातून मार्च 2017 अखेरपर्यंत जिल्ह्यातील 64 गावात ऊर्जा विकासाअंतर्गत पथदिव्यांची कामे करण्यात आली. सन 2017-18 या वर्षात वीज वितरण कंपनीने 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे, त्यापैकी 3.50 कोटी रुपये मंजूर झाले असून यातून जिल्ह्यातील 70 गावात पथदिव्यांची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
      सन 2017-18 या वर्षात दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत 96 कोटी 8 लक्ष रुपयांची कामे मंजूर असून या योजनेतून कृषी ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यात एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत 28 कोटी 20 लक्ष रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून या योजनेअंतर्गत गोंदिया व तिरोडा शहरातील विद्युत वितरण जाळ्याचे सक्षमीकरण करण्यासाठी, तसेच तांत्रिक व व्यवसायीक वीज हानी कमी करण्यास मदत होईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्युत फिडर लाईन व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देवून कामे करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      श्री.बडोले यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील मुंडीपार व काटी, गोरेगाव तालुक्यातील मोहाडी, तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव(मेंढा), देवरी तालुक्यातील मुल्ला, सडक/अर्जुनी तालुक्यातील कोकणा, आमगाव तालुक्यातील ठाणा, सालेकसा तालुक्यातील तिरखेडी येथे 33 के.व्ही.च्या उपकेंद्राची कामे लवकरच सुरु करण्यात येतील. जिल्ह्याचा 760 कोटीचा ऊर्जा विकासाचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

      आ.रहांगडाले म्हणाले, दिवसेंदिवस विद्युत जोडणीची संख्या वाढत आहे, परंतू ट्रान्सफॉर्मरची क्षमता तीच कायम राहते. अशावेळी ट्रान्सफॉर्मरवर दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. अशावेळी वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन देतांना ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून दयावी असे सांगितले. सभेला  समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपअभियंता एस.आर.कायंदे, मेडाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र माडे यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment