जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 13 April 2017

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर व शेतीपुरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा - पालकमंत्री बडोले

                                खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
       जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आली पाहिजे, त्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. कृषि विभागाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
      13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      पालकमंत्री पुढे म्हणाले, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येते. या बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दयावा. जिल्ह्यातील बहुतेक धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करुन त्यांना बोनसचा लाभ मिळण्यास सहकार्य करावे. धान साठवणूकीसाठी गोदाम ठरविण्याचे अधिकार लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. 1 मे पासून दोन्ही एजन्सींनी धान खरेदीची तयारी पूर्ण करावी.
      रब्बी हंगामात सिंचनाचे योग्य नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषिपंपांना वेळीच वीज जोडणी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना योग्य वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मोठ्या प्रमाणात कसे देता येईल याचे नियोजन करावे. फिडर निहाय समित्यांचे गठण करण्यात यावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्यात याव्यात. शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे काढावे असेही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.
     श्रीमती मेंढे म्हणाल्या, शेतात खोलवर बोअरवेल करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने समज देवून बोअरवेल करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करावा. त्यामुळे जलसंकट निर्माण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
     जिल्हाधिकारी काळे म्हणाले, बोअरवेलच्या मशीन जिल्ह्यातील काही भागात आल्या आहेत. या मशीनवर उपविभागीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असावे. त्यांना बोअर करण्याची परवानगी देवू नये. लवकरच याबाबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     सन 2017-18 च्या खरीप हंगामात 25 हजार 360 क्विंटल बियाण्यांची महाबीजकडून आणि 13134 क्विंटल बियाण्यांची खाजगीतून मागणी करण्यात आली आहे. युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते आणि मिश्र खतांची एकूण 75 हजार मेट्रीक टनाची मागणी करण्यात आली आहे. चालू हंगामात 247 कोटी 21 लक्ष रुपये पीक कर्ज वाटपाचे लक्ष असून यामध्ये  126 कोटी 50 लक्ष रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, 46 कोटी 51 लक्ष ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना 74 कोटी 20 लक्ष रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सिंचन प्रकल्प व इतर साधनापासून 1 लक्ष 28 हजार 881 हेक्टर सिंचनाचे नियोजन असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी सांगितले. आढावा सभेला कृषि, सिंचन व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment