जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 30 April 2020

महाराष्ट्र दिनाच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा- पालकमंत्री अनिल देशमुख

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी

आपल्यासह संपूर्ण जग भयंकर अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला करीत आहे. राज्य स्थापनेचा हा 60 वा वर्धापन दिन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा कायमचा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाला साथ द्यावी. असे आवाहन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा  60 वा वर्धापन दिन 1 मे 2020 रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पालकमंत्री देशमुख आपल्या शुभेच्छा संदेशातून म्हणतात की, ज्या थोर विभूतींनी महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात आपल्या प्राणांचे योगदान दिले आहे त्यांना अभिवादन करून त्यांचे योगदान स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्य स्थापनेचा 60 वर्धापन दिन साजरा करीत असताना शासन आणि प्रशासन कोरोना विषाणूला पराभूत करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे.कोरोनाचा  प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. या लढ्याला लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे.घरातून बाहेर न पडता कोरोना संसर्ग साखळी तोडून ही लढाई आपल्याला जिंकायची असल्याचे ते म्हणाले.
 लढाईतील कोरोना हा अदृश्य शत्रू जरी असला तरी लढाईचे तंत्र आत्मसात करून सर्वांनी एकजुटीने लढा देऊन या विषाणूवर मात करणे शक्‍य असल्याचे सांगून  श्री. देशमुख म्हणाले की, प्रत्येकाने नियमित हात स्वच्छ धुवावेत,तोंडावर आणि नाकावर मास्क लावावा. मास्क नसल्यास स्वच्छ रूमाल बांधावा.प्रत्येकाने शारीरिक अंतर ठेवावे. ताप,सर्दी, खोकला असल्यास जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन उपचार करावे. जिल्ह्यात 20 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह अन्य यंत्रणांचे कौतुक केले. कोरोनाबाधित व्यक्तीही बरी होऊ शकते हे आपल्या जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णाने सिद्ध करून दाखविले आहे.26 मार्चला कोरोनाबाधित आढळलेला हा युवक उपचारातून 10 एप्रिलला त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बरा होऊन घरी गेला आहे. संकट जरी मोठे असले तरी मनात भीती न बाळगता त्यावर मात करता येणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
1मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त गोंदिया येथील ध्वजारोहण समारंभात सहभागी होण्याची मनापासून आपली इच्छा असल्याचे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले की, मी मुंबई येथे असल्यामुळे शक्य होणार नाही.राज्यात असलेल्या संचारबंदी दरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्याचा गृहमंत्री म्हणून लक्ष ठेवून आहे.जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे माझे लक्ष असून मी सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.जिल्ह्यातील गरीब व्यक्ती या काळात अन्नधान्यापासून वंचित राहू नये असे निर्देशही संबंधित विभागाला दिले आहे.जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस विभागासह अन्य यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे


No comments:

Post a Comment