जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 16 April 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विशेष दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा - पालकमंत्री अनिल देशमुख

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला जिल्ह्याचा आढावा

\
    कोरोना विषाणू संसर्ग जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
         आज 16 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची  माहिती जाणून घेतली. गोंदिया येथून जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे,यांच्यासह इतर सर्व नोडल अधिकारी प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते.
         पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेने आणि वैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने गोंदिया शहरातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा निगेटिव्ह होऊन घरी परतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे व यंत्रणांचे अभिनंदन केले. जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आपली कोणतीही आवश्यकता असल्यास आपण चोवीस तास उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जिल्ह्यात लॉकडाऊनचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घरातच राहावे. सार्वजनिक ठिकाणी महत्वाच्या कामानिमित्त जातांना नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्क, स्वच्छ कापडाचे रुमाल किंवा दुपट्ट्यांचा वापर करावा. सर्वांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे असे आवाहन देखील त्यांनी जिल्ह्यातील जनतेला यावेळी केले. 
         पोलीस विभागाने नाकाबंदीसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या ग्रीन शेडची पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशंसा केली. जिल्ह्यात फिल्डवर कर्तव्यावर असणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन शेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना दिले.
         जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी यावेळी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू घरपोच सेवा पुरविण्यात येत आहे. नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी  जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष, व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयक विविध शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे 24 तास डॉक्टरांची सेवा हेल्पलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात 17 निवारागृहात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 737 नागरिकांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
         पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात कलम 144 चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. गोंदिया शहरातील गणेशनगर हा भाग कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्यामुळे पोलिसांचा या भागात पुढील 28 दिवस चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे. 553 नागरिकांना इमर्जन्सी पासेस देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात 186 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 3 हजार 877 वाहनचालकांवर कारवाई करून 7 लाख 99 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी दिली.

          जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी जिल्ह्याकरिता कोविड नमुन्यांची चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी व्हेंटिलेटर खरेदीसाठी तसेच पोलीस प्रशासनाला मदतीसाठी 200 गृहरक्षक उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधीची मागणी यावेळी केली. तसेच जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी, पोलिस व महसूल कर्मचारी जे फिल्डवर काम करतात अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी यावेळी पालकमंत्र्यांना केली. 
         कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माइल्ड, मॉडरेट व सिवियर या प्रकारच्या कोरोना संशयित  रूग्णांसाठी किंवा लक्षणे असलेल्या नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर- 677 खाटाडेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर- 190 खाटा, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल- 200 खाटाचे उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी यावेळी दिली. 
         जिल्ह्यात आज 9 व्हेंटिलेटर उपलब्ध असून 12 व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ट्रिपल लेअर मास्क 64 हजार 850 व एन-95 मास्क 1749 तसेच पीपीई किट 196 उपलब्ध असून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 4 खाटांचे कक्ष उभारण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दोडके यांनी यावेळी दिली.
                                                   00000



No comments:

Post a Comment