जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 15 April 2020

गोंदिया जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही बारा हजार शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार - पालकमंत्री अनिल देशमुख


         गोंदिया जिल्ह्यातील ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा बारा हजार कुटुंबांना जिल्हा प्रशासनातर्फे  कुटुंबास एक असे जीवनावश्यक वस्तूंचे संच देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एकही व्यक्ती  उपाशी राहणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री गोंदिया तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.
         गोंदिया जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एकूण 299288 कार्डधारक असून त्यावरील लोकसंख्या 1407078 आहे. यापैकी अंत्योदय कार्डधारक 79156 तर प्राधान्य कुटुंब योजना कार्ड धारक 139613 असे एकूण 218769 कार्डधारक आहेत. यावर नोंदविलेल्या 1025393 लोकसंख्येला एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे नियमित अन्नधान्य तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे प्रति मानसी पाच किलो तांदूळ यांचे मोफत वाटप होत आहे. तसेच मे व जून करिता अन्न सुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या  85133 केशरी कार्ड धारकांची संख्या व त्यावरील 351269 लोकसंख्या यांना मे व जून या दोन महिन्याकरिता गहू प्रति किलो 8 रुपये व तांदूळ प्रति किलो 12 रुपये प्रमाणे प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ राज्य शासन उपलब्ध करून देत आहे.
       कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
00000

No comments:

Post a Comment