जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday 24 April 2020

कोरोना मुकाबल्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज



     कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जग भयभीत झाले आहे. कोरोना हे आजच्या घडीला जगावर आलेले मोठे संकट आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन एकजुटीने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन हे आरोग्य यंत्रणा, पोलीस विभागासह अन्य यंत्रणांना सोबत घेऊन दिवस-रात्र काम करीत आहे.
        जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जिल्हा परिषद काळजी घेत असून कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच 545 ग्रामपंचायती सज्ज आहेत. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये हॅन्डवॉश स्टेशन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी हात कशाप्रकारे धुतले पाहिजे याची तांत्रिक माहिती देणारे बॅनर या सर्व ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले आहे. सचित्र बॅनरवरून हात कशाप्रकारे धुवावे याची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे. कोरोना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत जागृती करणारे बॅनर्स जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आले आहे. या बॅनरवरील माहिती वाचून नागरिक दक्ष होत आहे, सोबत इतरांना सुद्धा कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत माहिती देत आहेत.
        जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जंतूनाशकाची फवारणी करण्यात आल्यामुळे कोरोनासह अन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. त्यामुळे रोगराईस प्रतिबंध करण्यास हातभार लागला आहे. ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पुढाकार घेतल्यामुळे  ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. 
       कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बाहेर राज्यात, जिल्ह्यात रोजगारासाठी  गेलेले गावातील व्यक्ती परत गावात आल्यास त्या व्यक्तीची तसेच विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती  गावातील नागरिकांनी सरपंच, तहसीलदार यांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने आवश्यकता असल्यास त्यांचे घरीच अलगीकरण देखील करण्यात आले. त्यांच्यावर ग्रामस्थांचे लक्ष होते. यावरून कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थ किती जागृत आहेत हे यापूर्वीच दिसून आले आहे. गावातील काही गरीब व गरजू व्यक्ती आहेत ज्यांना योजनांचा लाभ मिळू शकत नाही अशांच्या मदतीसाठी  ग्रामपंचायत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देखील केली आहे. काही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना मास्कचे वाटप केले आहे. कोरोनविरुद्धची ही लढाई जिंकण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती तयारीनिशी सज्ज झाल्या आहेत. ग्रामस्थांची सजगता, ग्रामपंचायतींनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, शासन आणि प्रशासनाचे लाभलेले पाठबळ यातून कोरोनाविरुद्धची लढाई ग्रामपंचायती निश्चितच जिंकतील.
00000

No comments:

Post a Comment