जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday 30 April 2020

महाराष्ट्र राज्याचा 60 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन


        महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन आज 1 मे  रोजी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी यावेळी राष्ट्रध्वजारोहण केले. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
        ध्वजारोहण प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कोषागार अधिकारी नंदकिशोर भंडारे, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ह्या शुभेच्छा संदेश पाठवून दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या शुभेच्छा संदेशाचे वाचन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी आपले योगदान दिले पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यावेळी म्हणाल्या.
        संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहे. काहींचा मृत्यू देखील झाला आहे. बाधित होण्याचे आणि मृत्यूचे सत्र सुरूच आहे. कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्यामुळे उपाययोजनेचा एक भाग म्हणून यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. केवळ जिल्हा मुख्यालयीच महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे त्यामध्ये नमूद केले होते. त्यानुसार जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राष्ट्रध्वजारोह समारंभ अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
00000


No comments:

Post a Comment