जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday 13 June 2017

कर्जाची परतफेड करण्यात महिलांचीच प्रामाणिकता - उषा मेंढे

आमगाव येथे वार्षिक सभा व प्रधानमंत्री मुद्रा बँक मेळावा

        केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला हया आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. असे प्रतिपादन जि.प.अअध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
        महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व तहसिल कार्यालय आमगाव यांच्या संयुक्त वतीने 13 जून रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज येथे आयोजित स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जि.प.सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य छबू उके, सिंधू भूते, गटविकास अधिकारी श्री.पांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, कनिष्ठ कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक श्री.राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
        श्रीमती मेंढे म्हणाल्या, घरच्या कर्त्या पुरुषाला आर्थिक सहकार्य करण्याचे कामही बचतगटातील महिला करतात. संकट काळात महिलेने जमा केलेला पैसा उपयोगी पडतो. एक-एक रुपयाची बचत करुन ती पैसा जमा करते. नोटबंदीच्या काळात महिलांनी खऱ्या अर्थाने बचत केलेला पैसा उपयोगी पडला. माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांच्या बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. गोंदिया जिल्हा निसर्ग संपन्न असल्यामुळे बचतगटातील महिलांनी वनावर आधारित विविध व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. महिला आता अबला राहिल्या नसून त्या सबला झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या.  
        केशवराव मानकर म्हणाले, ज्या व्यक्तींना स्वत:चा रोजगार उभा करुन स्वावलंबी व्हायचे आहे त्यांचेसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत उपयुक्त आहे. बेरोजगार तरुण-तरुणी व गरजू व्यक्तींना स्वबळावर उभे करण्यासाठी मुद्रा योजना आशेचा किरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे. कौशल्य विकसीत करुन स्वावलंबी करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. फार कमी महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले असून मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले पाहिजे असे ते म्हणाले.
       काळा पैसा बाहेर यावा यासाठी नोटबंदी केल्याचे सांगून श्री.मानकर पुढे म्हणाले, जास्तीत जास्त व्यक्तींनी कॅशलेस व्यवहार करावा. कॅशलेस व्यवहारामुळे प्रगतीला वाव आहे. भिम ॲप आधार कार्डला लिंक केले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी काम करावे असे ते म्हणाले.
       आ.पुराम म्हणाले, पुर्वी चुल आणि मुल या क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढे येत आहे. आज त्या व्यवहारासाठी बँकेत सुध्दा येत आहे. बँकांच्या मदतीमुळे महिला पुढे येवू लागल्या आहे. बेरोजगार, गरजू व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ बँकांनी जास्तीत जास्त व्यक्तींना दयावा. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना सक्षम व योग्य मार्गदर्शन करीत आहे. महिला एकत्र येवून काम करीत आहे. बचतगटातील महिलांच्या मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
       चांगल्या कामगिरी करणाऱ्या महिलांना आज सन्मानीत करण्यात येत असल्याचे सांगून श्री.पुराम म्हणाले, माविमचे काम उर्जा देणारे आहे. आमगाव येथील स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राला सभागृहाची, संगणकाची आवश्यकता आहे, हे माहित असल्याचे सांगून श्री.पुराम पुढे म्हणाले, आमदार निधीतून यासाठी पैसा देता येत नसल्यामुळे खासदार निधीतून स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्रासाठी 1 लक्ष रुपये मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
        डॉ.भूजबळ म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. जिल्ह्यात काही मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना मोठ्या व्याजदराचे कर्ज देवून वसुलीसाठी त्रास देत आहे. सुसुत्रतेने प्रधानमंत्री योजनेतून महिलांना कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. दारुबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या बचतगटातील महिलांना पोलीस विभाग सहकार्य करेल. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे.                                                                    दारुबंदीसाठी महिलांनी जिल्ह्यात चांगली भूमिका बजावली असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, महिला केवळ घरच्या अर्थमंत्रीच नव्हे तर त्या चांगल्या कायदामंत्री देखील आहे. घरी महिला जे सांगतील जे ठरवतील तोच निर्णय होत असतो. अर्थकारण, समाजकारण व राजकारणात देखील महिला महत्वाची भूमिका बजावत आहे. माविमच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यात येत आहे. पोलिसांची भूमिका केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्ह्यांचा तपास करणे एवढीच नाही तर चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
        यावेळी श्रीवास्तव म्हणाले, मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना दिलेल्या कर्जाचा उपयोग त्या चांगल्याप्रकारे करीत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच केली पाहिजे. जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहारावर भर दिला पाहिजे. येणाऱ्या काळात मोबाईल हेच बँक म्हणून उपयोगात येणार आहे. छोटे-छोटे व्यवहार देखील कॅशलेस पध्दतीने केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी सविता पुराम यांनी विविध योजनेविषयी, तहसिलदार साहेबराव राठोड यांनी महसूल विभागाच्या योजना, श्री.गणराज व श्री.राठोड यांनी रोजगार व कौशल्य विकासाच्या विविध योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
       प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कॅनरा बँक, बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आदींनी बचतगटांच्या महिलांना शिशु गटातून कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्र तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वीनी जनईकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
        मान्यवरांच्या हस्ते स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव सन 2016-17 वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी गाव हागणदारीमुक्त करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून महिला आघाडी ग्रामसंस्था बोरकन्हार, चैतन्य ग्रामसंस्था ठाणा, सर्वात जास्त कर्ज घेणार बचतगट म्हणून इंदिरा गांधी महिला बचतगट बिरसी, संगीनी महिला बचतगट आमगाव, उत्कृष्ट पशूसखी छाया ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी शोभा तावाडे व संध्या पटले, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून तृप्ती बहेकार व दुर्गा बोपचे यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
        स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील यावेळी संपन्न झाली. या सभेत सन 2016-17 चा प्रगती अहवाल मांडण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापूरे होत्या. यावेळी कार्यकारीणीतील पदाधिकारी  छाया ठाकरेाा
, शोभा पटले, तृप्ती बहेकार, अरुणा बहेकार, वनिता मेहर, पुष्पा कुंभारे, उर्मिला शरणागत, चंदा बिसेन, शालू उके, नंदा तुरकर, खुरवंता चौधरी यांची उपस्थिती होती. साधन केंद्राच्या व्यवस्थापक आशा दखने यांनी अहवाल वाचन केले.
       आमगाव तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉल तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता.

       कार्यक्रमाला आमगाव तालुक्यातील 300 बचतगटातील 1500 महिलांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, नामदेव बांगरे, श्री.पंचभाई, पुस्तकला खैरे, शोभा तावाडे, संगीता बोरकर, संख्या पटले, दिपा साखरे, दुर्गा बोपचे, रामेश्वर सोनवाने, प्रफुल अवघड, एकांत वरधने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आशा दखने यांनी मानले.

No comments:

Post a Comment