सामाजिक न्याय दिन साजरा
|
26
जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण
विभाग कार्यालय गोंदियाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी
करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार
संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप
पाटील-भूजबळ, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव
झोड, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, जि.प.पशू व कृषि समिती सभापती छाया
दसरे, जि.प.माजी सभापती सविता पुराम यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री
बडोले म्हणाले, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम शाहू महाराजांनी त्याकाळी
केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विशिष्ट जातीच्या विकासासाठी काम केले नसून त्यांनी
समाजातील सर्वच घटकांसाठी काम केले आहे. सामाजिक उत्थानाची प्रक्रिया त्या काळातच
सुरु झाली. या कार्यात समाजसुधारक व संतांचे योगदान महत्वाचे होते. प्रस्थापितांना
विरोध करुन समाजसुधारक व संतांनी त्या काळीच सुधारणांची सुरुवात केली. त्यांनी मानव
मुक्तीच्या दृष्टीने काम केले असे त्यांनी सांगितले.
जातीपाती
विरहीत समाज सुधारणांचे काम झाले पाहिजे या ध्यासाने समाज सुधारणांसाठी या समाज
सुधारकांनी पुढाकार घेतल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्यांचा समतेचा संदेश
सर्वसामान्यपर्यंत गेला पाहिजे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती बंद झाल्या
पाहिजे. सामाजिक न्याय विभाग समाजातील विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना
राबवित आहे. ज्या मुलांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी स्वाधार
योजना सुरु करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांना निवासाच्या
दृष्टीने वसतीगृहाची व्यवस्था यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे श्री.बडोले
यांनी सांगितले.
उपेक्षित
घटकाचा विकास करण्याचा संकल्प असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, 2019 पर्यंत
सर्वांना घरे देण्याचे काम करण्यात येईल. मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता
यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका तयार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्तीचे प्रश्न, जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रश्न सोडविण्यात येतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्योजकता विकास योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या
माध्यमातून मागासवर्गीय घटकातील युवकांना उद्योजक बनविण्यात येईल. संघ लोकसेवा
आयोगाच्या परीक्षेत यावर्षी 14 विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली
आहे. पुढच्या वर्षी 25 विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जातील असा
विश्वास श्री.बडोले यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार पुराम म्हणाले, शाहू महाराजांचा जन्मदिवस
म्हणजे अत्यंत मौल्यवान दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केल्यामुळे
वंचित घटकातील व्यक्तींना चांगल्या पदावर जाता आले. आरक्षणामुळे सामाजिक प्रगती
होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाज कल्याण
विभाग विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त
व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्षारोपण करतांना भारतीय
वृक्षांची लागवड करावी. ज्यामुळे वन्यप्राणी पक्षांचे रक्षण करण्यास मदत होणार
असल्याचे त्यांनी सांगितले. समाज कल्याण समिती सभापती श्री.वडगाये यांनी यावेळी
आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सामाजिक न्याय भवन परिसरात पालकमंत्री
यांचे आगमन होताच त्यांनी एक वर्ष पूर्ण केलेल्या 700 झाडांचा वाढदिवस केक कापून
साजरा केला. सामाजिक न्याय दिनानिमित्त नागपूर विभागातील आश्रम शाळेतील व
वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा, जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिकेत
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन सन 2017 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
करण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या वतीने जात वैधता
प्रमाणपत्र, दिव्यांग विवाहीत जोडप्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
करण्यात आले.
कार्यक्रमाला नागपूर विभागातील समाज कल्याण
विभागाअंतर्गत येत असलेले विविध आश्रमशाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी, नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त
श्री.वानखेडे यांनी केले. संचालन प्रा.रजनी गायधने यांनी केले, उपस्थितांचे आभार
विशेष अधिकारी संभाजी पोवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश
वानखेडे, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज
कल्याण निरीक्षक अंकुश केदार यांच्यासह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील व
जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000
No comments:
Post a Comment