जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 7 June 2017

मुद्रा योजनेतून बँकांनी महिलांना स्वावलंबी करावे - आ.संजय पुराम

वार्षिक सर्वसाधारण सभा व प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा
  शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती बचतगटातील महिलांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेणे त्यांना सोईचे होईल. बचतगटाच्या माध्यमातून महिला व्यवसायाकडे वळत आहेत. बचतगटातील महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी मुद्रा योजनेचा लाभ दयावा, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
          महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व तहसिल कार्यालय देवरी यांच्या संयुक्त वतीने 7 जून रोजी माँ धुकेश्वरी मंदीर देवरी येथे नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्र देवरीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा व प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे उदघाटक म्हणून श्री.पुराम बोलत होते.
       कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य उषा शहारे, सरिता रहांगडाले, माजी जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, तहसिलदार विजय बोरुडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, खंड विकास अधिकारी श्री.हिरुळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक श्री.शिवणकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी निलेश भूते, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी नीरज कायरकर, कॅनरा बँकच्या व्यवस्थापक पुजा वर्मा, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, सत्य सामाजिक संस्थेचे देवेंद्र गणवीर, नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष साजीदा बेगम सिध्दीकी यांची उपस्थिती होती.
      महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यात महिलांच्या विकासाच्या दृष्टीने चांगले काम केले आहे असे सांगून श्री.पुराम म्हणाले, देवरीसारख्या मागास, दुर्गम, आदिवासी बहुल तालुक्यातील चांदलमेटा या आडवळणाच्या गावातील वंदना उईके ही आदिवासी महिला माविमच्या माध्यमातूनच थायलंड व रोमला जावून आली. इतर महिलांना त्यामुळे प्रेरणा मिळण्यास मदत झाली आहे. महिलांचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड त्या वेळीच करतात. देवरी विधानसभा मतदार संघातील बचतगटांच्या महिलांना आपल्या आमदार निधीतून जास्तीत जास्त सहकार्य करण्यात येईल.
      देवरी तालुक्यातील बचतगटातील 80 टक्के महिला हया आदिवासी असल्याचे सांगून श्री.पुराम म्हणाले, आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या विविध योजनांचा त्यांना लाभ देण्यात येईल. बचतगटातील महिलांसाठी तालुक्याच्या ठिकाणी चांगली जागा उपलब्ध झाली तर त्यांच्या विकासाला गती येईल. तालुका क्रीडा संकूल हे भविष्यात बचतगटांच्या विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. बचतगटांच्या महिलांना प्रगतीकडे नेण्यासाठी विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून बचतगटांच्या महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
       श्रीमती मेंढे म्हणाल्या, महिला हया आता अबला राहिल्या नसून त्या सबला झाल्या आहेत. माविमच्या बचतगटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक व्यवहार करण्यास मदत झाली आहे. त्यांना मिळत असलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे त्या आता स्वावलंबी होवू लागल्या आहेत. महिलांनी जर मनात निश्चय करुन स्वावलंबी होण्याचा निर्धार केला तर निश्चितच महिलांचा विकास होईल. महिलांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेवून त्या योजनांचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक उन्नती करावी, असे त्यांनी सांगितले.
        श्री.ठाकरे म्हणाले, माविममुळे बचतगटातील महिलांच्या सक्षमीकरणाला चांगला हातभार लागला आहे. बचतगटातील काही महिला पशूसखी, मत्स्यसथी, कृषीसखी तर काही महिला इंटरनेट साथी म्हणून चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. माविमने जिल्ह्यात बचतगटांकरीता पोषक वातावरण तयार केले आहे. बचतगटातील महिलांना चांगला फायदा होईल अशाच प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. आजचे युग हे मार्केटींगचे युग आहे. केवळ उत्पादक म्हणून बचतगटातील महिलांकडे बघितले तर फार काही त्यांच्या पदरात पडणार नाही.
        मार्केटींग निर्माण करण्याची जबाबदारी माविमने स्वीकारली पाहिजे असे सांगून श्री.ठाकरे म्हणाले, पूर्वी महिला संघटीत नसल्यामुळे घराबाहेर पडत नव्हत्या, आज त्या संघटीत होवून घराच्या बाहेर पडत आहेत. महिलांनी आज काळाची गरज ओळखून झेप घेणे गरजेचे आहे. पूर्वी कर्जासाठी सावकारावर अवलंबून राहावे लागत होते, आज बँका कर्जासाठी सहकार्य करीत आहे. कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेत प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून तक्रारींची दखल घेण्यात येईल. योजनेच्या लाभापासून जर कुणाला डावलल्या जात असेत तर त्याला विचारण्याचा हक्क आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
       श्रीमती शहारे म्हणाल्या, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. महिलांना आता आपली मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आता समाधान होत असून आता त्या आर्थिक उन्नतीकडे जात आहेत.
        श्रीमती पुराम यावेळी म्हणाल्या, सृदृढ बालकाला जन्म दयायचा असेल तर महिलांनी तंबाखू, गुळाखू खावू नये, कारण त्यात निकोटीनयुक्त पदार्थ असतो. बिना बीपीएलने घरकूल योजना व धडक सिंचन योजना मिळणे सुरु झालेली आहे. सुकन्या समृध्द योजना, प्रधानमंत्री अपघात विमा योजना आदी योजनांची महिलांनी माहिती जाणून घ्यावी व त्या योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
     यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी महिलांचे प्रबोधन केले. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री.चौधरी, तहसिलदार श्री.बोरुडे, नाबार्डचे श्री.जागरे, बँक ऑफ इंडियाचे श्री.कायरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.शिवणकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे श्री.भुते यांनी  मार्गदर्शन केले. सत्य संस्थेचे देवेंद्र गणवीर, नारीचेतनाच्या अध्यक्ष श्रीमती सिध्दीकी,   बचतगटाच्या सदस्य असलेल्या व पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेल्या सत्यशीला टेंभूर्णीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      बँक ऑफ इंडिया शाखा देवरीच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत शिशु गटात कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्र श्रीमती प्रमिला मोहते, श्रीमती अवंता काथाडे, श्रीमती जनन मरस्कोल्हे, श्रीमती कुंती मेश्राम, श्रीमती प्रमिला राऊत, श्रीमती छाया मडावी यांना देण्यात आले. या महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे. देवरी तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत चांदलमेटा येथील बचतगटाच्या वंदना उईके हया थायलंड व रोम येथे नूकत्याच जावून आल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार, 100 टक्के शौचालय ग्रामसंस्था वनश्री ग्रामसंस्था चिचेवाडा व शारदा ग्राम संस्था जेठभावडा, 5 लाख रुपये कर्ज घेवून आर्थिक व्यवसायामध्ये वाढ केल्याबद्दल माऊली महिला बचतगट देवरी, 4 लाख रुपये कर्ज घेवून आर्थिक व्यवसायामध्ये वाढ केल्याबद्दल लक्ष्मी महिला बचतगट देवरी, अन्नपूर्णा महिला बचतगट हरदोली, उत्कृष्ट पशूसखी म्हणून मासूलकसा येथील दिलेश्वरी बंसोड, उद्योजक तथागत महिला बचतगट चारभाटा, उद्योजक म्हणून  सदगुरु महिला बचतगट फुटाणा येथील वंदना लाडे, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणन वासना टेंभूर्णीकर, उत्कृष्ट सहयोगीनी म्हणून अस्मीता भैसारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
        या मेळाव्यात आरोग्य तपासणी शिबीर, लोकराज्य मासिक, सत्य सामाजिक संस्था, महाराष्ट्र उद्योजकता विकास, जिल्हा उद्योग केंद्र, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, माऊली महिला बचतगट देवरी, यशस्वी लाख उत्पादक व संकलन केंद्र चांदलमेटा, नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरी यांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले होते.
        यावेळी नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरी अंतर्गत वर्षभरात केलेल्या कामाच्या वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्र देवरीच्या व्यवस्थापक हेमलता वालदे, लेखापाल लवकुश शर्मा, उपजिविका सहयोगिनी गीता नांदगाये, सुनीता भैसारे, सुशीला कुरसूंगे, साधन समुदाय गटाच्या कल्पना जांभूळकर, प्रमिला मोहबे, वासना टेंभूर्णीकर यांनी सहकार्य केले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. संचालन सविता तिडके यांनी केले, उपस्थितांचे आभार नारीचेतना लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक हेमलता वालदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment