जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 7 October 2020

बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आणि संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करून जास्तीत जास्त बाधितांचा शोध घ्यावा -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

गोंदिया दि.07(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन आणि ज्यांना सर्दी-खोकला-ताप आहे अशा संशयित रुग्णांची चाचणी करून जास्तीत जास्त कोरोना बाधितांचा शोध घ्यावा.असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

6 ऑगस्ट रोजी श्री पटोले गोंदिया दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना बाधित रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचाराची तसेच उपलब्ध असलेल्या साधन साधनसामुग्रीची माहिती जाणून घेतली.यावेळी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नरेश तिरपुडे,जिल्हा शल्य चिकित्सक भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री पटोले म्हणाले,कोरोनाचा काळ संपल्यानंतर मुंबई येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाबाबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची,त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी झाला पाहिजे असे ते म्हणाले.

जिल्ह्यात डॉक्टर्स आणि नर्सेसची जी रिक्त पदे आहेत ही पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगून श्री पटोले म्हणाले, ही पदे त्वरित भरल्यास रुग्णांना वेळीच चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. आरोग्य विभागाकडे अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यविषयक तपासणी करण्यात या यंत्रसामुग्रीचा चांगला उपयोग होणार आहे. रुग्णाला कोणता आजार झाला आहे त्यावर कोणते औषधोपचार करायचे यासाठी डॉक्टरांना मदत होणार आहे. ही यंत्रसामग्री हाताळण्यासाठी चांगले तांत्रिक तज्ञाची नियुक्ती करावी. ज्या यंत्रसामग्रीची रुग्णांच्या उपचारासाठी व निदानासाठी आवश्यकता आहे त्याची खरेदी करावी.काही अडचणी येत असल्यास याबाबत अवगत करून द्यावे म्हणजे ही साहित्य सामुग्री खरेदी करता येईल.असेही पटोले यावेळी म्हणाले.

 रुग्णालयातील सर्व अधिकारी, डॉक्टर्स व नर्सेस यांनी नियमितपणे उपस्थित राहून रुग्णांना चांगली सेवा द्यावी असे सांगून श्री पटोले म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी योग्य समन्वय ठेवून कामे करावी. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी श्री पटोले यांनी घेतली.

जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी तसेच बाधित रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती अधिष्ठाता,जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावेळी दिली.


 

No comments:

Post a Comment